येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने खाण खात्याच्या कार्यालयाला टाळे ठोकल्याप्रकरणी गोवा फाउंडेशनचे निमंत्रक क्लॉड आल्वारीस आणि राहुल बासू यांना तूर्त दिलासा दिला आहे. खाण कार्यालयाला टाळे ठोकल्या प्रकरणी दोघांना अंतरिम जामीन मंजूर केला असून या प्रकरणी पुढील सुनावणी २८ जून रोजी होणार आहे.
या प्रकरणी खाण खात्याचे सुरक्षा रक्षक यशवंत तळगिरी यांनी पणजी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून आल्वारीस आणि बासू यांच्याविरोधात पणजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. खाण खात्याच्या कार्यालयाला टाळे ठोकल्या प्रकरणी चौकशीसाठी पणजी पोलिसांनी समन्स बजावले होते. त्यानंतर गोवा फाउंडेशनचे आल्वारीस आणि बासू यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली होती. जिल्हा व सत्र न्यायालयात त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जांवर काल सुनावणी घेण्यात आली. न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत दोघांना अटक करू नये, असा आदेश पोलिसांना देण्यात आला आहे.