Home Featured पर्वरीतील सहापदरी उड्डाणपुलाच्याउद्घाटनासाठी पंतप्रधानांना निमंत्रण

पर्वरीतील सहापदरी उड्डाणपुलाच्याउद्घाटनासाठी पंतप्रधानांना निमंत्रण

0

दिल्ली दौऱ्याहून परतल्यानंतर मुख्यमंत्र्यांची माहिती; अन्य महत्त्वपूर्ण विषयांवरही चर्चा

नवी दिल्लीत बुधवारी झालेल्या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी गोव्याला भेडसावणाऱ्या ध्वनिप्रदूषणविषयक नियमांमध्ये सवलत, वाळू उपशासाठी परवानगी मिळावी, यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गोवा भेटीचे निमंत्रण दिले आहे. पंतप्रधान मोदी येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर 2026 दरम्यान गोव्यात येण्याची शक्यता असून, त्यांच्या हस्ते पर्वरी येथील सहापदरी उड्डाणपूल, कुणबी ग्राम व इतर प्रकल्पांचे उद्घाटन व नवीन प्रकल्पांचे भूमिपूजन केले जाऊ शकते, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नवी दिल्ली दौऱ्यावरून परतल्यानंतर आल्तिनो पणजी येथे पत्रकारांशी बोलताना काल दिली.

राज्याला ध्वनिप्रदूषणविषयक कडक नियमांमुळे आणि सध्याच्या निर्बंधांमुळे पर्यटनावर परिणाम होत आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत त्या मुद्द्यावर चर्चा केली. वेडिंग्स डेस्टिनेशनवर परिणाम होत आहेत. कायद्यात दुरुस्ती करून मनोरंजन क्षेत्राला काही सवलत देण्याच्या शक्यतेवरही चर्चा केली, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
राज्यातील वाळू उपशावरील निर्बंधाचा प्रश्न मोठा आहे. वाळू उपशाच्या मुद्द्यावरही चर्चा झाली. गोव्यासारख्या किनारपट्टीवरील राज्यांसाठी सवलत देण्याची मागणी पंतप्रधानांकडे केली, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

‘कॅप्टन ऑफ पोर्ट्स’च्या
इमारतीचे उद्घाटन 8 जूनला

पणजीतील नवीन ‘कॅप्टन ऑफ पोर्ट्स’ इमारतीचे उद्घाटन येत्या 8 जून रोजी केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सोनोवाल यांच्याशी गोव्यातील नवीन जलवाहतूक प्रकल्पाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. गोव्यात सुमारे 50 हजार लोक फेरीसेवेद्वारे प्रवास करतात आणि राज्यातील जलमार्ग अधिक सुधारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नवी दिल्ली दौऱ्यात त्यांचीही भेट घेतली. त्यांच्याकडे गोव्याशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा केली, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ईएसआय इस्पितळाविषयी चर्चा
मडगाव येथील नवीन ईएसआय वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यान्वयन लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन केंद्रीय कामगार व रोजगारमंत्री मनसुख मांडविया यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना
काल दिले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या नवी दिल्ली येथील दौऱ्यात मनसुख मांडविया यांची भेट घेऊन त्यांच्याशी दक्षिण गोव्यातील ईएसआय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषयावर चर्चा केली. मडगाव येथील ईएसआय इस्पितळात नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दक्षिण गोव्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर गोव्यातील आरोग्यसेवा आणि वैद्यकीय शिक्षण लक्षणीयरीत्या मजबूत होईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

मंत्रिमंडळातील रिक्त जागा लवकरच भरणार
राज्य मंत्रिमंडळातील रिक्त असलेली एक जागा लवकरच भरली जाणार आहे. येत्या काही दिवसांत राज्य मंत्रिमंडळातील रिक्त जागा भरली जावी, अशी आपली इच्छा आहे. मंत्रिपदासाठी अजून नाव निश्चित झालेले नाही. मंत्रिपदासाठी निश्चित केले जाणारे नाव सर्वप्रथम माध्यमांना कळवले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.