Home Featured सिद्धरामय्यांकडून कर्नाटकच्यामुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

सिद्धरामय्यांकडून कर्नाटकच्यामुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

0

राज्यपालांच्या सचिवांकडे राजीनामा सोपवला

गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी सुरू होत्या. या घडामोडीनंतर अखेर काल सिद्धरामय्या यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. आता डी. के. शिवकुमार यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे.

सिद्धरामय्या यांनी गुरुवारी सकाळी एक महत्त्वपूर्ण ‘ब्रेकफास्ट मीटिंग’ आयोजित केली होती. त्या मीटिंगमध्येच सिद्धरामय्या यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसमोर राजीनामा देण्याची घोषणा केली. यावेळी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे देखील उपस्थित होते.

या घोषणेनुसार काल दुपारी सिद्धरामय्या यांनी लोकभवनमध्ये दाखल होत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत हे लोकभवनमध्ये उपस्थित नसल्यामुळे सिद्धरामय्या यांनी राज्यपालांचे सचिव प्रभू शंकर यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला.

राजीनामा दिल्यानंतर सिद्धरामय्या यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर भाष्य केले. ‘मी माझा शब्द पाळला आहे’, असे सांगत आपण राष्ट्रीय राजकारणात जाण्यास इच्छुक नसल्याचेही सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले. त्यामुळे काँग्रेसची राज्यसभेची ऑफर सिद्धरामय्या यांनी नाकारली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे

सिद्धरामय्या काय म्हणाले?
काँग्रेस पक्षाच्या हायकमांडने मला राजीनामा देण्यास सांगितले, त्यानुसार मी आज माझा राजीनामा सादर केला आहे. मला खात्री आहे की जेव्हा राज्यपाल लोकभवनमध्ये येतील, तेव्हा ते राजीनामा स्वीकारतील. कारण संविधानानुसार हे करणे आवश्यक आहे. आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे. त्यामुळे नव्या मुख्यमंत्र्यांना (सरकार स्थापन करण्याची) परवानगी देणे घटनात्मक आहे. तसेच मला मुख्यमंत्री पदाची संधी दिल्याबद्दल सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो, असे सिद्धरामय्या म्हणाले.

काँग्रेसची राज्यसभेची ऑफर नाकारली
राजीनामा दिल्यानंतर सिद्धरामय्या हे राज्यसभेवर जाणार असल्याच्या चर्चा होत्या. तसेच काँग्रेस हायकमांडनेही सिद्धरामय्या यांना राज्यसभेची ऑफर दिल्याची माहिती समोर आली होती. मात्र, काँग्रेसची राज्यसभेची ऑफर सिद्धरामय्या यांनी नाकारली आहे. मला राज्यसभेत जायचे नाही. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत कर्नाटकच्या राजकारणात राहीन, असे सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले. काँग्रेस एकत्र राहावी हीच भूमिका माझी देखील कायम राहिली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

कर्नाटकात नेतृत्व बदल का?
कर्नाटकातील नेतृत्वाचा मुद्दा जवळपास वर्षभराहून अधिक काळ चर्चेत होता. 2023 च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाने सरकार स्थापन केल्यावर केंद्रीय नेतृत्वाकडून अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन दिले होते असे सांगितले जाते. त्यामुळे या मागणीवर डी. के. शिवकुमार यांचे समर्थक ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच अडीच-अडीच वर्षाचे आश्वासन मिळाल्यामुळेच डी. के. शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा स्वीकार केला होता, असेही सांगितले जाते. त्यामुळे या अडीच-अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यानुसार सिद्धरामय्या यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.