चालकाविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल
मडगाव पोलिसांनी शिर्ली येथे दुचाकी वाहनाला धडक देऊन पलायन (हिट अँड रन) प्रकरणात थार गाडीच्या चालकाविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून, थारचालक स्वराज जगताप (19 वर्षे, रा. पुणे) याला काल अटक केली. मडगाव येथील प्रथम वर्ग न्यायालयाने संशयित स्वराज जगताप याला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
मंगळवारी राष्ट्रीय मार्गावर शिर्ली परिसरात एका थार या रेंट अ कारने दुचाकीस्वार महिलेला धडक देऊन पलायन केले होते. महामार्गावरून जाणाऱ्या दुसऱ्या एका कारच्या डॅशकॅममधील फुटेजमुळे ही घटना कैद झाली होती. सदर रेंट अ कारने चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करताना दुचाकीला धडक दिल्याने निव्हिया गोम्स ही महिला गंभीर जखमी झाली. त्या महिलेवर गोमेकॉमध्ये उपचार सुरू आहेत. बुधवारी त्या महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली.
या अपघाताची माहिती मिळताच मडगाव पोलिसांनी तपासाला सुरुवात करून अपघातास कारणीभूत ठरलेली थारगाडी आणि गाडीतून प्रवास करणाऱ्या तिघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली होती. या अपघात प्रकरणामध्ये कारचालकाच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून कारवाईला सुरुवात केली आहे.