पी. विजयन यांच्या घरावरील छापेमारीवेळी घडली घटना
केरळममधील तिरुवनंतपुरम येथे माजी मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या निवासस्थानी छापा टाकण्यासाठी आलेल्या ईडीच्या पथकावर विजयन यांच्या समर्थकांनी हल्ला केला. 12 सदस्यीय पथकाने काल बेकरी जंक्शन येथील विजयन यांच्या निवासस्थानी छापा टाकला. त्यांच्या मुलीच्या ‘एक्झालॉजिक सोल्युशन्स’ या आयटी कंपनीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात हे छापे टाकण्यात आले. हे प्रकरण ‘कोचीन मिनरल्स अँड रुटाइल लिमिटेड’ (सीएमआरएल) द्वारे केलेल्या मनी लाँड्रिंगशी संबंधित आहे.
या प्रकरणात ईडीने 2024 मध्ये पीएमएलए अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या व्यवहारात मनी लाँड्रिंग झाल्याचा संशय ईडीला असल्याने विजयन यांच्या मालमत्तांवर छापेमारीची कारवाई करण्यात आली. ईडीने काल पी. विजयन यांच्या घरावर छापेमारी केली. विजयन यांची मुलगी विना व जावई मोहम्मद रियाज यांच्याशी संबंधित ठिकाणांवर देखील ईडीने छापेमारी केली. तब्बल 10 ठिकाणी ईडीकडून छापा टाकण्यात आला. केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथील विजयन यांच्या घरात ईडीची कारवाई सुरू असताना बाहेर माकपच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या दिला. सात तासांनी विजयन यांच्या घरातून ईडीचे पथक बाहेर पडल्यानंतर कार्यकर्त्यांनी ईडी अधिकाऱ्यांच्या वाहनांवर विटा तसेच अंडी फेकून मारली. काठीने वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या.