कर्नाटकच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा सत्तानाट्याचा अंक पाहायला मिळत असून, सिद्धरामय्या हे गुरुवारी (दि. 28) मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. तसेच डी. के. शिवकुमार यांच्याकडे मुख्यमंत्रिपद जाईल, अशी शक्यता आहे. सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्यानंतर डी. के. शिवकुमार यांची गुरुवारीच काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड होईल आणि त्यानंतर ते सरकार स्थापनेचा दावा करतील. तसेच आणखी एक नवा ‘फॉर्म्युला’ समोर आला असून, राज्यात तब्बल 4 उपमुख्यमंत्री नेमले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गुरुवारी बंगळुरूमधील ‘कावेरी’ या सरकारी निवासस्थानी सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यात होणाऱ्या ब्रेकफास्ट मीटिंगमुळे राजकीय वर्तुळात राजीनाम्याच्या चर्चा अधिकच रंगल्या आहेत. विशेष म्हणजे डिसेंबर 2025 मध्येही दोन्ही नेत्यांमध्ये अशीच चर्चित ब्रेकफास्ट डिप्लोमसी झाली होती. त्यावेळी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेल्या चर्चांदरम्यान पक्षाने एकजुटीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता.
सूत्रांच्या दाव्यानुसार, राहुल गांधी यांनी सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रिपद सोडण्याचा सल्ला दिला असून, डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्याची तयारी सुरू आहे. त्या बदल्यात सिद्धरामय्या यांना राष्ट्रीय राजकारणात मोठी भूमिका आणि त्यांचे पुत्र यतींद्र यांना कर्नाटकात उपमुख्यमंत्रिपद देण्याचा प्रस्ताव चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे.
याशिवाय, औपचारिक घोषणेपूर्वी सिद्धरामय्या हे मंत्र्यांसोबत आणि आमदारांसोबत बैठक घेऊ शकतात. काँग्रेसचे वरिष्ठ नेते के.सी. वेणुगोपाल आणि रणदीप सिंग सुरजेवाला यांच्या उपस्थितीत याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, दलित, ओबीसी, लिंगायत आणि अल्पसंख्याक समाजातून प्रत्येकी एका नेत्याला उपमुख्यमंत्रिपद दिले जाऊ शकते. दलित गटातून जी. परमेश्वरा आणि प्रियांक खर्गे यांची नावे चर्चेत आहेत. ओबीसी गटातून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र यतींद्र सिद्धरामय्या यांचे नाव पुढे आले आहे. लिंगायत समाजातून एम. बी. पाटील आणि ईश्वर खांद्रे यांना संधी मिळू शकते, तर अल्पसंख्याक गटातून के. जे. जॉर्ज, यू. टी. खादर आणि जमीर अहमद खान यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे.
आज राज्यपालांची भेट घेणार?
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या दि. 28 मे रोजी राजीनामा देऊ शकतात. सिद्धरामय्या यांनी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितला आहे. दरम्यान, काँग्रेस आमदार आर. व्ही. देशपांडे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय आधीच घेतला आहे. ते गुरुवारी राजीनामा देऊ शकतात. पुढील मुख्यमंत्री कोण असेल हे हायकमांड ठरवेल.