अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ असलेल्या होर्मोझगान प्रांतात मंगळवारी पहाटेच्या सुमारास हल्ला केला. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याचा निषेध करत अमेरिकेने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. इराणने या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. दोन्ही देशांत शांतता चर्चा सुरू असून, ती योग्य दिशेने पुढे जात असल्याची माहिती समोर येत असताना हा हल्ला झाल्याने इराणने आक्रमक भूमिका
घेतली आहे.
आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या लष्कराने मंगळवारी पहाटे दक्षिण इराणमध्ये हल्ला केला. या हल्ल्यात सुरुंग पेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या बोटी आणि क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही बचावात्मक कारवाई असल्याचे स्पष्टीकरण अमेरिकेने दिले आहे. या हल्ल्यामुळे इराण आक्रमक झाले असून, तेहरान या हल्ल्याला प्रत्युत्तर देईल व स्वतःचा बचाव करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
इराणी परराष्ट्र मंत्रालयाचा इशारा
अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. अमेरिकेने गेल्या 48 तासांत होर्मोझगान प्रदेशात शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. या आक्रमक कृतींमुळे उद्भवलेल्या परिणामांसाठी इराण अमेरिकेला जबाबदार धरतो, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. इराणी माध्यमांनी देखील या हल्ल्याचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. सात आठवड्यांनंतर अमेरिकेने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तांमध्ये म्हटले आहे. दरम्यान, अमेरिकेच्या या हल्ल्यामुळे आता इराणच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शांतता चर्चा
अमेरिका आणि इराण यांच्यात सध्या शांतता करारशी निगडीत चर्चा सकारात्मक पद्धतीने पुढे जात असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील सागरी वाहतूक सुरळीत करणे, इराणचा अणुकार्यक्रम आणि उच्च संवर्धित युरेनियमचे भवितव्य या महत्वाच्या मुद्यांवर देखील योग्य वाटाघाटी सुरू असून, या चर्चांसाठी दोन महिन्यांचा वेळ दिला जात आहे, असे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. शांतता चर्चेसाठी मध्यस्थी करत असलेल्या पाकिस्तानने देखील चर्चा पुढे सरकत असल्याचे म्हटले आहे.