पणजी महापालिका प्रशासनाचा निर्णय; 30 मे रोजी होणार होती सभा
आझाद मैदानावरील घटकराज्य दिन प्रदर्शनामुळे परवानगी रद्द करण्याचा निर्णय
पणजी महापालिका प्रशासनाने ‘इनफ इज इनफ’ संघटनेला शनिवार दि. 30 मे रोजी येथील आझाद मैदानावर जाहीर सभा घेण्यासाठी दिलेली परवानगी रद्द केली आहे. सोमवारी हा निर्णय घेण्यात आला. घटकराज्य दिन प्रदर्शनामुळे सभेसाठी दिलेली मान्यता रद्द केली जात आहे, असे पणजी महानगरपालिका प्रशासनाने एका पत्राद्वारे इनफ इज इनफ संघटनेला कळविले आहे.
राज्यातील जमीन संवर्धनासाठी निवृत्त न्यायाधीश फेर्दिन रिबेलो यांच्या नेतृत्वाखाली इनफ इज इनफ ही एक चळवळ सुरू करण्यात आली आहे. बेकायदेशीर कृत्ये आणि पर्यावरणाच्या विनाशाविरोधात आवाज उठविला जात आहे. या संघटनेकडून राज्यात विविध भागात जागृती सभांचे आयोजन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर, इनफ इज इनफ या संघटनेने गोवा घटकराज्य दिनी आझाद मैदानावर जाहीर सभेची घोषणा केली होती. या जाहीर सभेसाठी पणजी महानगरपालिकेने 21 मे रोजी मान्यता देखील दिली होती.
राज्य सरकारकडून घटकराज्य दिनानिमित्त आझाद मैदानावर एक प्रदर्शन आयोजित केले जात आहे. त्यामुळे 21 मे रोजी सभेसाठी दिलेली परवानगी रद्द करण्यात आली आहे. सभेच्या परवानगीसाठी भरलेले शुल्क मूळ पावती सादर केल्यावर परत केले जाईल, असे पत्रात म्हटले आहे.
राजकीय दबावामुळे मान्यता रद्द
राजकीय दबावामुळे इनफ इज इनफच्या 30 मे रोजीच्या जाहीर सभेला देण्यात आलेली मान्यता मागे घेण्यात आली आहे. या आंदोलनाला वाढत असलेल्या जनसमर्थनामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये असलेली भीती आणि अस्वस्थता या कृतीतून उघड झाली आहे, असे इनफ इज इनफ या संघटनेचे कार्यकर्ते फ्रान्सिस कुएलो यांनी म्हटले आहे.
भीती अन् हताशा उघड
महानगरपालिकने योग्य प्रक्रियेनंतर परवानगी दिली होती आणि आता ती मागे घेण्यासाठी सबबी शोधत आहेत. ही माघार त्यांची भीती आणि हताशा उघड करते. घटकराज्य दिनासारख्या प्रमुख स्मरणीय प्रसंगांशी संबंधित सरकारी प्रदर्शने साधारणपणे काही महिने आधीच नियोजित केली जातात, ऐनवेळी नाही, असेही फ्रान्सिस कुएलो यांनी म्हटले आहे. पणजी महानगरपालिकेने नियोजित जाहीर सभेसाठी पर्यायी जागा उपलब्ध करावी किंवा आझाद मैदानावर सभा घेण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी
कुएलो यांनी केली.