सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय अशी कामगिरी केलेले ख्रिस्ती धर्मगुरू फादर डॉ. फिडेलिस बोलमॅक्स परेरा (47) यांचे मंगळवारी सकाळी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात निधन झाले. काल संध्याकाळी केपे येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
चिखली चर्चचे धर्मगुरू असलेले डॉ. फिडेलिस बोलमॅक्स परेरा हे 24 मे रोजी आपल्या चर्चमधील सहकाऱ्यांसह सहलीवर निघाले असता अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने वास्को रेल्वे स्थानकावर कोसळले होते. नंतर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती; पण त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. मंगळवारी सकाळी तेथे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
एमएस्सीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर परेरा यांनी पर्यावरण व सजीवसृष्टी या विषयात पीएचडी केली होती. पर्यावरणाचे अभ्यासक असल्याने राज्यात पर्यावरणाविषयी युवा वर्गामध्ये जागृती घडवून आणण्याचे काम त्यांनी केले. गोवा बचाव, म्हादई बचाव या आंदोलनासह त्यांनी हल्लीच राज्यात सुरू झालेल्या भू-रुपांतरविरोधी आंदोलनातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. फादर बोलमॅक्स परेरा यांनी 2023 साली छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलताना ते एक मोठे प्रशासक होते; पण ते देव नसल्याचे उद्गार काढल्याने त्यावरून बराच वाद झाला होता. त्यांना हिंदूधर्मीयांकडून मोठ्या टीकेचा सामना करावा लागला होता.