भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) केरळमध्ये मोसमी पाऊस (मान्सून) नियोजित वेळेच्या चार दिवस अगोदर म्हणजेच 26 मे च्या दरम्यान दाखल होण्याची शक्यता काल व्यक्त केली. तसेच, यावर्षी गोव्यात सुध्दा नियोजित वेळेच्या आधी म्हणजे 1 जूनच्या दरम्यान मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे.
केरळमध्ये गतवर्षी 2025 मध्ये मान्सून 24 मे रोजी दाखल झाला होता. त्यावेळी आयएमडीने मोसमी पाऊस 27 मे रोजी दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. 2024 रोजी केरळमध्ये मान्सून 30 मे रोजी दाखल झाला होता. त्यावेळी मान्सून 31 मे रोजी दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. गेल्या 21 वर्षांमध्ये (2005-2025) केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाच्या तारखेबाबत भारतीय हवामान विभागाचा अंदाज केवळ 2015 हे वर्ष वगळता अचूक ठरला आहे.
भारतीय मुख्य भूभागावर नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या आगमनाची सुरुवात केरळमधील मोसमी वाऱ्यांच्या आगमनाने होते आणि उष्ण व कोरड्या हंगामातून पावसाळ्यात होणाऱ्या संक्रमणाचे हे एक महत्त्वाचे सूचक आहे. जसजसा मोसमी वारा उत्तरेकडे सरकतो, तसतसा त्या भागांमध्ये उन्हाळ्याच्या तीव्र तापमानापासून दिलासा मिळतो. नैऋत्य मोसमी वारा साधारणपणे 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो, त्यामध्ये सुमारे 7 दिवसांचे मानक विचलन असते. भारतीय हवामान विभाग 2005 पासून केरळमधील मोसमी वाऱ्यांच्या आगमनाच्या तारखेसाठी कार्यात्मक अंदाज जारी करत आहे.