सीबीआयकडून देशभरात छापे व झडती सुरू
वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या ‘नीट’ परीक्षेमधील कथित पेपरफुटीशी संबंधित प्रकरणी सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (सीबीआय) 5 आरोपींना अटक केली आहे. तसेच देशभरात अनेक ठिकाणी झडत्या घेतल्या आहेत. याबाबत सीबीआयने प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
सीबीआयने मंगळवारी दि. 12 मे 2026 रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. नीट युजी 2026 परीक्षा घेताना अनियमितता आणि कथितरीत्या पेपरफुटी प्रकरणात, भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाकडून जी लेखी तक्रार करण्यात आली, त्याच्या आधारे हा गुन्हा नोंदवण्यात आला होता.
सीबीआयने आतापर्यंत या प्रकरणात 5 आरोपींना अटक केली आहे. त्यातील 3 जणांना जयपूरमधून तर एकाला गुरुग्राम आणि एकाला नाशिकमधून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सध्या इतरही अनेक संशयितांची चौकशी सुरू आहे.
सीबीआयने देशातील अनेक ठिकाणी झडत्यादेखील घेतल्या असून या प्रकरणी तपासकार्य सुरू आहे.
अनेक पुरावे हाती
या झडत्या घेताना आणि अटक करत असताना, गुन्ह्याशी संबंधित अनेक पुरावे आणि मोबाईल फोनसह इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त करण्यात आली आहेत. तपास करताना सीबीआय, राजस्थानच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप (एसओजी) बरोबर समन्वय साधून आहे. स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपनेच या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली होती.
माहितीनुसार महाराष्ट्राच्या नाशिक येथून नीट पेपर फुटीप्रकरणात शुभम खैरनार याला मंगळवारीच अटक केली होती. तर मांगीलाल बिवाल, विकास बिवाल आणि दिनेश बिवाल यांना राजस्थानमधील जयपूर येथून अटक करण्यात आली आहे. तर यश यादव नावाच्या व्यक्तीला हरियाणा येथील गुरुग्रमामधून सीबीआयने अटक केली. सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीयाकडे सोपवल्यानंतर नीट पेपर फुटी प्रकरणात आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. या प्रकरणात आणखी काहीजणांना अटक होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान दुसरीकडे या प्रकरणात महाराष्ट्रातून अटक करण्यात आलेला आरोपी शुभम खैरनार याचा भाऊ भावेश खैरनार यालादेखील सीबीआयने ताब्यात घेतले असून या प्रकरणात त्याची चौकशी सुरू केली आहे.
शुभमला सीबीआय कोठडी
पेरफुटीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या नाशिकच्या शुभम खैरनार याला न्यायालयाने सीबीआयची दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
‘नीट युजी’ परीक्षा रद्द झाल्यामुळे
कुडतरीत विद्यार्थ्याची आत्महत्या
नेसाय कुडतरी येथे एका 17 वर्षीय विद्यार्थ्याने ‘नीट-युजी 2026′ ची परीक्षा रद्द झाल्यामुळे तणावातून आत्महत्या केली. यावेळी त्याने यापुढे मला पुन्हा स्पर्धा परीक्षेला बसायचे नाही, अशी चिठ्ठी लिहून गळफास घेत आत्महत्या केली. हा विद्यार्थी मूळचा बंगळूर येथील असून मडगाव परिसरातील एका उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत होता.
नीट परीक्षेचे पेपर फुटल्यामुळे ‘नीट’ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पुन्हा ही परीक्षा देण्याची इच्छा नसल्याचे सांगत या विद्यार्थ्याने मंगळवारी आत्महत्या केली.
सदर विद्यार्थ्याचे वडील रेल्वेमध्ये गार्ड म्हणून कार्यरत आहेत. घटनेच्या वेळी त्याची आई आणि बहीण मूळ गावी गेल्या होत्या. घरात कुणीही नसताना ही त्याने आत्महत्या केली. वडील कामावरून घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मायणा-कुडतरी पोलिसांनी या प्रकरणी पंचनामा करत अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. विद्यार्थ्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.