Home Featured बिट्स पिलानीमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या

बिट्स पिलानीमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या

0

घटनास्थळी सापडले पत्र, पोलिसांचा तपास सुरू

डिसेंबर 2024 पासून सातवी घटना

केरळचा रहिवासी आणि पीएचडीच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी अर्जुन साबू (26) याने बिट्स पिलानी गोवा कॅम्पसच्या मागे असलेल्या आकार हाइट्स येथील त्याच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. घटनास्थळावरून एक पत्र सापडले असून वेर्णा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

बिट्स पिलानीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या मृत्यूची ही गेल्या 17 महिन्यांतील सातवी घटना आहे.
पोलिसांच्या सूत्रांनुसार, मृत विद्यार्थी पीएचडीच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता आणि तो संस्थेच्या कॅम्पसमागे असलेल्या ‘आकार हाइट्स’ अपार्टमेंटमधील भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता. घटनास्थळावरून एक पत्र सापडले असून त्याच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याविषयी आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणांवर येणाऱ्या दबावाविषयी पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.

दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी एग्ना क्लीटस यांनी सांगितले की, यावर्षी नोंदवलेली ही दुसरी घटना असून, गेल्या वर्षीही विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची अशीच दोन प्रकरणे समोर आली होती.
दरम्यान, अनेक विद्यार्थ्यांचा असा गेल्या दीड दोन वर्षांत असा मृत्यू झाल्यामुळे स्थानिक आमदार आतोन वास यांनी या घटनांची आणि कॅम्पस व्यवस्थापनाची औपचारिक चौकशी करण्याची मागणी केली आहे.

साहाय्यता सुविधा स्थापन
दरम्यान, 24 एप्रिल 2026 रोजी झालेल्या आढावा बैठकीदरम्यान, बिट्स पिलानी, केके बिर्ला गोवा कॅम्पसच्या डीनने समितीला जिल्हास्तरीय देखरेख समितीने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात आली आहे अशी माहिती दिली. संस्थेने मानसिक आरोग्य व्यावसायिकांची संख्या वाढवून आपली मानसिक आरोग्य सहाय्यता प्रणाली अधिक सक्षम केली असून विद्यार्थ्यांसाठी मानसिक आरोग्य सहाय्यता सुविधा स्थापन केली आहे अशीही माहिती दिली.
समितीने पुढे नमूद केले की, सुरू असलेल्या मानसिक आरोग्य आणि स्वास्थ्यविषयक जनजागृती उपक्रमांचा एक भाग म्हणून आरोग्य सेवा संचालनालयामार्फत 10 एप्रिल 2026 रोजी कॅम्पसमध्ये एक वैद्यकीय शिबिर आयोजित करण्यात आले होते. याव्यतिरिक्त, डॉ. विठोबा मळकर यांच्यामार्फत मानसिक स्वास्थ्य, तणाव व्यवस्थापन, भावनिक लवचिकता आणि वेळेवर व्यावसायिक मदत घेण्याचे महत्त्व यावर लक्ष केंद्रित करून विविध जनजागृती आणि समुपदेशन सत्रे आयोजित करण्यात आली होती.

बिट्स पिलानीमध्ये मृत्यूंची मालिका

बिट्स पिलानीमध्ये गेल्या डिसेंबर 2024 पासून 17 महिन्यांत सात विद्यार्थ्यांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे बिट्स पिलानीमध्ये विद्यार्थ्यांच्या मृत्यूंची मालिका सुरू झाली असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.
डिसेंबर 2024 मध्ये ओम प्रियान सिंग या दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला होता. मार्च 2025 मध्ये अथर्व देसाई, दुहेरी पदवीच्या तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्याचा कॅम्पस परिसरात मृत्यू झाला. मे 2025 कृष्ण कसरत हा विद्यार्थी वसतिगृहाच्या खोलीत मृत आढळला. ऑगस्ट 2025 मध्ये कुशाग्र जैन हा तृतीय वर्षाचा विद्यार्थी वसतिगृहात मृत आढळला. सप्टेंबर 2025 मध्ये ऋषी नायर या दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्याचा संशयास्पद आत्महत्येच्या प्रकरणात मृत्यू झाला.
यंदा फेब्रुवारी 2026 रोजी वैष्णवी जितेश या तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थिनीचा वसतिगृहाच्या खोलीत मृतदेह आढळला. त्यानंतर काल बुधवारी अर्जुन साबू याचा मृतदेह सापडला. गेल्या डिसेंबर 2024 पासूनची विद्यार्थ्यांच्या मृत्यूची ही सातवी घटना नोंद झाली आहे.