ओकांब-धारबांदोडा येथील दुधसागर नदीत रविवारी संध्याकाळी बुडालेला आयआयटीचा विद्यार्थी इम्तियाज हुसेन (21, रा. लडाख) याचा मृतदेह काल सापडला. सोमवारी सकाळपासून बेपत्ता इम्तियाज याचा शोध अग्निशमन दलाने सुरू केला होता. त्यानंतर दुपारी त्याचा मृतदेह आढळून आला.
गट दूधसागर नदीवर आंघोळीसाठी आला होता. यावेळी सर्वजण आंघोळ करत असतानाच पाण्याचा अंदाज न आल्याने इम्तियाज हुसेन हा विद्यार्थी बुडाला. आंघोळीसाठी गेलेल्या इतर विद्यार्थ्यांनी त्वरित फोंडा पोलीस व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना फोनवरून माहिती दिली; पण रात्र झाल्याने शोधमोहीम थांबवण्यात आली होती. सोमवारी सकाळी पुन्हा एकदा फोंडा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आणी फोंडा पोलिसांनी शोध घेण्यात सुरुवात केली. यावेळी धारबांदोड्या तालुक्याचे उपजिल्हाधिकारी अमितेश शिरवईकर आणि मामलेदार मनोज कोरगावकर यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना शोधकार्य राबवताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला. इम्तियाजचा मृतदेह सापडल्यानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याबाहेर काढला. त्यानंतर फोंडा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक कृष्णा गावस यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह मडगाव येथील इस्पितळात पाठवून दिला.
दरम्यान, धारबांदोडा तालुक्याचे उपजिल्हाधिकारी अमितेश शिरवईकर यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, दूधसागर नदीत बुडून बळी जाण्याचे प्रकार वाढत असल्याने मंगळवारी सकाळी फोंडा पोलिसांच्या अधिकाऱ्यांची खास बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत चर्चा करून तोडगा काढण्यात येईल. यापूर्वी कुळे पोलीस स्थानकाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती, असे त्यांनी नमूद केले.
सोमवारी महाविद्यालयात
होता शेवटचा दिवस
पाण्यात बुडून मृत्यू झालेला इम्तियाज हुसेन हा फर्मागुडी येथील आयआयटीचा विद्यार्थी होता. गेली 4 वर्षे आयआयटीचे शिक्षण घेतलेल्या इम्तियाज हुसेन याचा सोमवारी महाविद्यालयात शेवटचा दिवस होता. मात्र रविवारी त्याच्या जीवनाचा अंतिम दिवस ठरला.