Home Featured धारबांदोडा येथे दूधसागर नदीतआंघोळीसाठी गेलेला विद्यार्थी बेपत्ता

धारबांदोडा येथे दूधसागर नदीतआंघोळीसाठी गेलेला विद्यार्थी बेपत्ता

0

ओकांब – धारबांदोडा येथील दुधसागर नदीत रविवारी संध्याकाळी आपल्या मित्रासोबत आंघोळ करण्यासाठी गेलेल्या इम्तियाज हुसेन (21, लडाख) हा युवक बेपत्ता झाला आहे. पाण्यात उतरलेला इम्तियाज हुसेन हा फर्मागुडी येथील आयआयटीचा विद्यार्थी होता. घटनेची माहिती मिळाल्यावर फोंडा पोलीस व अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बेपत्ता झालेल्या युवकाचा शोध घेतला. पण रात्र झाल्याने शोध कार्य बंद करण्यात आले असून आज सोमवारी सकाळी पुन्हा शोध घेण्यात येणार आहे.

प्राप्त माहितीनुसार काल रविवारी दुपारी 8 विद्यार्थ्यांचा गट नदीवर आंघोळीसाठी आला होता. यावेळी सर्वजण आंघोळ करीत असतानाच पाण्याचा अंदाज आला नाही. त्यात इम्तियाज हा बेपत्ता झाला.
आंघोळीसाठी गेलेल्या इतर विद्यार्थ्यांनी त्वरित फोंडा पोलीस व अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना फोनवरून माहिती दिली. घटनेची माहिती मिळाल्यावर फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक मोहन गावडे व अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन शोधमोहीम सुरू केली. पण अंधार पसरल्यानंतर मोहीम थांबवण्यात आली.

राज्यात गरमीचा पारा चढलेला असल्याने मोठ्या संख्येने लोक नदीवर अंघोळीसाठी येत आहेत. त्यामुळे स्थानिक पंचायतीने या ठिकाणी आंघोळीसाठी येणाऱ्या लोकामध्ये जागृती करण्यासाठी विविध ठिकाणी फलक लावले आहेत. तसेच दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशानुसार नदीच्या काठी विविध ठिकाणी फलक लावण्यात आलेले आहेत.

दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच नदीत अंघोळ करण्यासाठी बंदीचा आदेश दिला होता. परंतु जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशाचे पालन न करता इतर भागातील लोक मोठ्या संख्येने नदीवर आंघोळीसाठी येत आहेत.