मंत्री सुभाष शिरोडकर यांचा इशारा
परवाने न घेता बेकायदेशीररित्या राज्यात कूपनलिका खोदणाऱ्यांना यापुढे 10 लाख रु.चा दंड ठोठावण्यात येणार असल्याचा इशारा काल जलसंसाधन खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यानी दै. नवप्रभाशी बोलताना दिला.
सध्या सरकारने राज्यातील बेकायदेशीर कुपनलिकांविरूद्ध मोहीम हाती घेतलेली असून येत्या 15 मेपासून राज्यभरातील बेकायदेशीर कूपनलिकांना सील ठोकण्याची कारवाई सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही शिरोडकर यांनी काल दिली. पणजीजवळील चिंबल परिसरातील 22 कूपनलिकांना सरकारने यापूर्वीच सील ठोकले असल्याची माहिती दै. नवप्रभाने काही दिवसांपूर्वी दिली होती. त्या पार्श्वभूमीवर काल जलसंसाधन खात्याचे मंत्री श्री. शिरोडकर यांच्याशी आमच्या प्रतिनिधीनी संपर्क साधला असता यापुढे राज्यात बेकायदेशीररित्या कूपनलिका खोदणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असून त्यांना 10 लाख रु.चा दंड ठोठावण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा दिला. बेकायदेशीररित्या कूपनलिका खोदणाऱ्यांना 10 लाख रु.चा दंड ठोठावण्याची तरतूद कायद्यात आहे. मात्र, अद्याप कुणालाही हा दंड ठोठावण्यात आलेला नाही. मात्र यापुढे असले प्रकार खपवून घेतले जाणार नसून 10 लाख रु.चा दंड ठोठावण्यात येणार असल्याचा इशारा दिल्याचे शिरोडकर म्हणाले.
चिंबल परिसरात व विशेष करून धारवाडकरनगर येथे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या कूपनलिका खोदण्यात आल्याची तक्रार आली होती. त्यानंतर सरकारने कारवाई करताना तेथील 22 कूपनलिकांना सील ठोकले असल्याची माहिती शिरोडकर यांनी दै. नवप्रभाला दिली होती.
शहरी भागांत बेकायदा कूपनलिकांत वाढ
राज्यातील शहरी भागांत जेथे उद्योगधंदे वाढलेले आहेत व ज्या परिसरात परप्रांतियांची वस्ती वाढलेली आहे अशाच भागांत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर कूपनलिका खोदण्यात आल्या असल्याची माहिती शिरोडकर यानी दिली.
राज्यात 150च्या आसपास बेकायदेशीर कूपनलिका
राज्यभरात अशा किती बेकायदेशीर कुपनलिका आहेत, असा प्रश्न केला असता, अशा बेकायदेशीर कूपनलिकांची संख्या ही जवळपास 150 एवढी असल्याची माहिती शिरोडकर यानी दिली. या सर्व बेकायदेशीर कूपनलिकांवर 15 मेपासून कारवाई करण्यात येणार असून या सर्व कुपनलिकांना सील ठोकण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.