राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 11 नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना निश्चित करणारी अधिसूचना जारी केली आहे. नव्या अधिसूचनेनुसार मतदारांच्या संख्येत घट झाल्याने मुरगाव नगरपालिकेतील चार प्रभाग आणि मडगाव नगरपालिकेतील एक प्रभाग कमी करण्यात आला आहे. इतर 9 नगरपालिकांची प्रभाग संख्या पूर्वीप्रमाणे कायम आहे.
राज्यातील मुरगाव, मडगाव, म्हापसा, कुडचडे-काकोडा, डिचोली, कुंकळ्ळी, केपे, काणकोण, वाळपई, पेडणे आणि सांगे या अकरा नगरपालिकांसाठी येत्या मे 2026 मध्ये निवडणूक घेतली जाणार आहे. राज्यातील मतदार यादीच्या एसआयआर प्रक्रियेनंतर जारी करण्यात आलेल्या नवीन मतदारयादीचा वापर 11 नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी केला जाणार आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने नव्याने प्रभाग रचना केली आहे.
मडगाव नगरपालिकेची प्रभाग संख्या 25 वरून 24 वर आणण्यात आली आहे, तर मुरगाव नगरपालिकेची प्रभाग संख्या 25 वरून 21 वर आणण्यात आली आहे.
अकरा नगरपालिकांची प्रभाग संख्या : मुरगाव नगरपालिका 21 प्रभाग, मडगाव नगरपालिका 24 प्रभाग, म्हापसा नगरपालिका 20 प्रभाग, कुडचडे-काकोडा नगरपालिका 15 प्रभाग, डिचोली नगरपालिका 14 प्रभाग, कुंकळ्ळी नगरपालिका 14 प्रभाग, केपे नगरपालिका 13, काणकोण नगरपालिका 12 प्रभाग, वाळपई नगरपालिका 10 प्रभाग, पेडणे नगरपालिका 10 प्रभाग, सांगे नगरपालिका 10 प्रभाग.