Home Featured युद्धबंदीसाठी आता एकमेकांसमोर अटी

युद्धबंदीसाठी आता एकमेकांसमोर अटी

0

पाकिस्तानच्या मध्यस्थीने अमेरिकेने मांडला 15 कलमी शांतता प्रस्ताव; इराणनेही ठेवल्या 7 अटीशर्थी

इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकेने एक पाऊल मागे टाकत पाकिस्तानच्या मध्यस्थीने ‘15 कलमी शांतता प्रस्ताव’ इराणसमोर ठेवला आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता चर्चा घडवून आणण्यासाठी पाकिस्तानने सकारात्मकता दर्शवली आहे. अमेरिकेने संघर्ष थांबविण्यासाठी 15 मुद्दे पाकिस्तानच्या माध्यमातून इराणसमोर मांडले आहेत. यामध्ये इराणने युरेनियमचे संवर्धन थांबवावे, होर्मुझ सामुद्रधुनी खुली करावी आणि अण्वस्त्र निर्मितीचे प्रयत्न बंद करावेत, अशा अटी या शांती प्रस्तावात ठेवण्यात आल्या आहेत. या बदल्यात इराणने देखील काही अटी युद्धबंदीसाठी ठेवल्या आहेत.

अमेरिकेन सर्वात महत्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीचा मुद्दा उपस्थित केला आहे. इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून दिल्यास, त्या बदल्यात तेहरानवरील सर्व निर्बंध उठवले जातील आणि बुशेहर येथे नागरी अणुऊर्जा विकसित करण्यासाठी त्याला मदतही केली जाईल, असा प्रस्ताव अमेरिकेने ठेवला आहे.
अमेरिकेच्या शांतता प्रस्तावात 15 मुद्दे आहेत. त्यानुसार, इराण समर्थन देणाऱ्या बंडखोरांना अप्रत्यक्ष रणनीती आणि या गटांना निधी व शस्त्रे पुरवणे थांबवावे. नतांझ, इस्फहान आणि फोर्डो येथील अणुसुविधा देखील इराणने बंद कराव्यात. इराणच्या क्षेपणास्त्रांची संख्या, पल्ला आणि त्यांचा वापर मर्यादित करावा. इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा. होर्मुझ खुली केल्यास तेहरानवरील सर्व निर्बंध उठवले जातील आणि बुशेहर येथे नागरी अणुऊर्जा विकसित करण्यासाठी त्यांना मदतही केली जाईल, असे एकूण 15 मुद्दे अमेरिकेने प्रस्तावात मांडल्याची माहिती समोर आली आहे.

अमेरिकेने शस्त्रसंधीसाठी इराणसमोर 15 मुद्दे ठेवल्याचे वृत्त समोर आल्यानंतर आता इराणने देखील संघर्ष थांबविण्यासाठी सात अटी मांडल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार, आखाती देशातील अमेरिकेने सर्व तळ बंद करावेत. इराणवर भविष्यात हल्ले होणार नाहीत याची ग्वाही द्यावी. हिजबुल्लाहवरील इस्रायलचे हल्ले थांबवावेत. समर्थक गटांवरील निर्बंध हटवावेत. युद्धात झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी. इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमावर निर्बंध घालू नयेत. आणि होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांकडून कर आकारण्यास मुभा द्यावी, अशा सात अटी इराणने ठेवल्याची माहिती समोर आली आहे.