फोंडा येथील पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज भरलेल्या आम आदमी पक्षाचे उमेदवार गीतेश नाईक यांच्या विरोधात घेतलेला आक्षेप निवडणूक अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी घेतलेल्या सुनावणीअंती फेटाळला. त्यामुळे मतदारसंघात भाजप, काँग्रेस व आप यांच्यामध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजप व काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना आम आदमी पक्षाचे उमेदवार भारी ठरत असल्याने दोन्ही पक्ष एकत्रित आल्याचा आरोप आपचे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी केला. मंगळवारी सकाळी अर्जांची छाननी सुरू असताना काँग्रेसतर्फे आपचे उमेदवार गीतेश नाईक यांच्या अर्जाविरोधात आक्षेप घेण्यात आला. बंगळुरू येथे गीतेश नाईक यांच्या विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा नोंद असून, त्याची माहिती लपवल्याचा आरोप करत त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याची मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली होती. मात्र बुधवारी सकाळी निवडणूक अधिकाऱ्यांनी काँग्रेसतर्फे सादर केलेला अर्ज फेटाळण्यात आला. आक्षेप अर्ज फेटाळल्यानंतर आपचे अध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी भाजप व काँग्रेसवर जोरदार टीका केली.