निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेतून माहिती
मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांना मतदान केंद्रांवर कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, याची माहिती काल भारतीय निवडणूक आयोगाने जारी केली आहे.
फोंडा मतदारसंघात विधानसभेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीदरम्यान या सर्व सुविधा मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यामध्ये पिण्याचे पाणी, तसेच मतदानाच्या दरम्यान उन्हात उभे राहावे लागू नये यासाठी ऊनापासून संरक्षण देणारी शेड उभारणे आवश्यक आहे. तसेच शौचालयाची सोय, उजेडासाठी विजेची व्यवस्था, दिव्यांग मतदारांसाठी रॅम्पची सुविधा आणि मतदानासाठी योग्य कंपार्टमेंट उपलब्ध करून द्यावे.मतदानासाठी रांगेत उभे राहणाऱ्या मतदारांना थकवा आल्यास बसण्यासाठी बाकांची व्यवस्था करावी. विविध गोष्टींबाबत माहिती देणारे सूचना फलक तसेच मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण करणारे एकाच प्रकारचे चार फलक प्रत्येक मतदान केंद्रावर लावण्यात यावेत. या फलकांवर मतदान केंद्रासंबंधीची सर्व माहिती देण्यात यावी. यात उमेदवारांची नावे, मतदारांची ओळख पटवण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, तसेच निवडणूक प्रक्रियेची माहिती समाविष्ट असावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
मोबाइल फोन जमा करण्याची सुविधा उपलब्ध
मतदान केंद्रात मतदानासाठी जाताना मतदारांना त्यांचे मोबाइल फोन बाहेर ठेवता यावेत यासाठी मोबाइल फोन जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचनाही देण्यात आली आहे.मतदान दिनापूर्वी या सर्व सुविधा पूर्णपणे तयार ठेवाव्यात, असा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे.