दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार; दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान
कुएली वेर्णा येथील रस्त्यावर काल (रविवारी) संध्याकाळी दुचाकी आणि इनोव्हा कार या दोन वाहनांमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीवरील व्यंकटेश बसरी (20) आणि राकेश संकप्पनवर (24) या दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला. हे दोन्ही युवक झुआरीनगर येथील रहिवासी आहेत. दरम्यान, या अपघातात दोन्ही वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे.
या अपघाताबाबत अधिक माहिती अशी की, काल (रविवारी) संध्याकाळी व्यंकटेश बसरी (20) आणि राकेश संकप्पनवर (24) हे आपल्या ताब्यातील जीए 06 यू 5201 या दुचाकीवरून वेळसांव रस्त्याने वेर्णाच्या दिशेने जात होते, तर इनोव्हा कार (जीए 06 यू 0519) ही किनी नगरच्या दिशेने जात होती. दोन्ही वाहने कुएली वेर्णा येथे आली असता समोरासमोर धडक बसली. ही धडक एवढी जबरदस्त होती, की दुचाकीस्वार हा इनोव्हा कारच्या खाली सापडला तर पाठीमागे बसलेला दुसरा युवक हा दूर फेकला गेला. मात्र, दोघेही रस्त्यावर जोरात आदळल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. दरम्यान, उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकीस्वार हा अतिवेगात वाहन चालवत होता. तसेच दुचाकीची धडक कारला बसली असल्याचेही प्रत्यक्षदर्शिनी पोलिसांना सांगितले. दरम्यान, या अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल केले.