गोव्याचे हित जपण्यासाठी आणि भाजपचा पराभव करण्यासाठी फोंडा पोटनिवडणुकीत आपला उमेदवार उभा न करता काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णयख़ ‘रिव्होल्युशनरी गोवन्स’ (आरजी) पक्षाने घेतला आहे. मात्र, 2027 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने आम्हाला गृहीत धरू नये, असा स्पष्ट इशाराही आरजीने दिला आहे.
रिव्होल्युशनरी गोवन्सचे प्रमुख मनोज परब यांनी रविवारी पणजीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार वीरेश बोरकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना परब यांनी फोंडा पोटनिवडणूक लढवावी की नाही, याचा निर्णय घेण्यासाठी शनिवारी पक्षाची एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत आरजीचे अस्तित्व दाखवून देण्यासाठी फोंडा पोटनिवडणूक लढवावी, असा विचार अनेक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. मात्र, भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्याचा अंतिम निर्णय पक्षाने घेतल्याचे त्यांनी सांगितले.