Home बातम्या …म्हणून भीतीपोटी सरकारने अधिवेशन गुंडाळले : काँग्रेस

…म्हणून भीतीपोटी सरकारने अधिवेशन गुंडाळले : काँग्रेस

0

गोवा विधानसभेचे अधिवेशन चालूच राहिल्यास आपण उघडे पडू ह्या भीतीपोटी आचारसंहितेचे कारण पुढे करून सत्ताधारी भाजपने अधिवेशन अर्ध्यावरच गुंडाळल्याचा आरोप काल काँग्रेस पक्षाने येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

यावेळी बोलताना गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सुनील कवठणकर हे म्हणाले की, विधानसभेच्या फोंडा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचे कारण पुढे करून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी गोवा विधानसभेचे आणखी 7 दिवसांचे कामकाज शिल्लक असताना अधिवेशन अर्ध्यावरच गुंडाळले. चालू अधिवेशनात काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांचे आमदार गोव्याशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे सातत्याने उपस्थित करीत होते. त्यात कलम 39 अ सारख्या भू-रुपांतरांना चालना देण्यासाठीच्या नगरनियोजन कायद्यातील कलमाला विरोध करणाऱ्या खासगी विधेयकाचाही समावेश होता. ही विधेयके संमत करण्यासाठी विरोधक आक्रमक बनतील, या भीतीपोटीच अधिवेशन अर्ध्यावर गुंडाळण्यात आल्याचा आरोप कवठणकर यांनी केला.

गोवा वैद्यकीय महाविद्यालय व गोवा दंत महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ओबीसी विद्यार्थ्यांना आरक्षण देण्याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यानी विधानसभेत उपस्थित केला होता. मात्र, सरकारने त्याकडे दुर्लक्ष करून ओबीसींना तेथे आरक्षण देण्यास आपणाला रस नसल्याचे दाखवून दिल्याचा आरोप कवठणकर यांनी केला. सरकारने 2022 पासून वेगवेगळे महोत्सव साजरे करण्यावर तब्बल 677 कोटी रुपये खर्च केल्याचा प्रश्नही कवठणकर यांनी उपस्थित केला.