Home बातम्या गोवा विधानसभा निवडणुकीत भ्रष्टाचाराचा पैसा वापरला नव्हता

गोवा विधानसभा निवडणुकीत भ्रष्टाचाराचा पैसा वापरला नव्हता

0

>> अरविंद केजरीवाल; भाजपचे कथित मद्य घोटाळ्याचे षड्यंत्र न्यायालयात उघड; घोटाळ्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर पक्षाकडून पणजीत सत्कार

भाजपने मद्य धोरण घोटाळ्याचे कट कारस्थान रचले होते. अखेर, न्यायालयात हे कटकारस्थान उघड झाले. त्या कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणातील एकही रुपया गोव्यातील 2022 च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने खर्च केला नव्हता, असे आपचे राष्ट्रीय संयोजक तथा माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल पणजीतील सत्कार सोहळ्यात बोलताना सांगितले.

दिल्ली येथील न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांची कथित मद्य धोरण घोटाळ्यातून निर्दोष मुक्तता केल्याने आपच्या गोवा प्रदेश समितीने त्यांचा जाहीर सत्कार मळा पणजी येथील एका सभागृहात काल आयोजित केला होता. यावेळी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री तथा आपच्या गोवा प्रभारी आतिशी मार्लेना, आपचे आमदार व्हेन्झी व्हिएगस, आमदार क्रूझ सिल्वा, आपचे गोवा प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक व इतरांची उपस्थिती होती.
दिल्ली आणि पंजाबमधील शिक्षण, आरोग्य, मोफत वीज, मोहल्ला क्लिनिक यांसारख्या कामांमुळे आपची राजकारणाची नवी दिशा भाजपसाठी आव्हान ठरली आणि त्यामुळे पक्षाला दडपण्याचा प्रयत्न झाला, असा दावा केजरीवाल यांनी केला.

फोंड्यात कचऱ्याचे ढीग, कुर्टी भागात अस्वच्छ सांडपाणी, तुंबलेली गटारे आणि खराब पायाभूत सुविधा हे गंभीर प्रश्न आहेत. या मूलभूत समस्यांकडे लक्ष देण्यात भाजप सरकार अपयशी ठरले असून, जनतेच्या प्रश्नांऐवजी राजकीय विरोधकांना लक्ष्य करण्यावर भर दिला जात आहे, अशी टीका केजरीवाल यांनी केली.
न्यायालयाच्या निकालातून ‘आप’चा प्रामाणिकपणा दिसून आला, असे गोवा प्रभारी अतिशी मार्लेना यांनी सांगितले.

गोव्याच्या निवडणुकीत आपने भ्रष्टाचाराचा निधी वापरल्याचा आरोप करण्यात आला होता. अखेर भ्रष्टाचार झालाच नाही. त्यामुळे भ्रष्टाचाराचा पैसा निवडणुकीत वापरल्याचा प्रश्नच येत नाही, असे न्यायालयाच्या आदेशातून स्पष्ट झाले आहे. खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे, असे न्यायाधीशांनी निकालावेळी नमूद केले आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.