पणजी महानगरपालिका निवडणुकीचा निकाल आज (दि. 13) होणार असून, सकाळी 8 वाजल्यापासून बांबोळी येथील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे. पणजीतील मतदारांनी मंत्री बाबूश मोन्सेरात यांचे पॅनल की युवा नेते उत्पल पर्रीकर यांचे ‘आम्ही पणजीकर’ पॅनल यापैकी कुणाला पसंती दिली हे निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
पणजी महानगरपालिकेच्या बुधवारी झालेल्या निवडणुकीत 69.07 टक्के एवढे मतदान झाले. यापूर्वी 2021 च्या महानगरपालिका निवडणुकीत 70.19 टक्के मतदान झाले होते. बांबोळी येथील मुखर्जी स्टेडियममध्ये मतमोजणीसाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मतमोजणीला प्रारंभ झाल्यानंतर साधारण एक-दोन तासांत निकाल जाहीर होऊ शकतात. पणजी महानगरपालिकेच्या अनेक प्रभागांत चुरशीच्या लढती झाल्याने निवडणूक निकाल धक्कादायक लागू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.