देशात एलपीजीचा तुटवडा नसल्याचा केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचा संसदेत दावा
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल संसदेत गॅस सिलिंडर तुटवड्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर, देशात पेट्रोल, डिझेल किंवा एलपीजीचा कोणताही तुटवडा नाही, असे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी संसदेत सांगितले. एकीकडे पुरी यांनी वरील दावा केला असताना गॅस सिलिंडर बुकिंगच्या नियमांत पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. नव्या नियमानुसार, ग्रामीण भागांत आता 45 दिवसांनंतरच एलपीजी सिलिंडर बुक करता येणार आहे, तर शहरी भागात 25 दिवसांचे अंतर ठेवून बुकिंग करता येईल. हरदीप सिंह पुरी यांनीच संसदेत ही माहिती दिली.
अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या झळा अनेक देशांना बसण्यास सुरूवात झाली आहे. जगभरातील तेल आणि वायूच्या वाहतुकीसाठी होर्मुझची सामुद्रधुनी हा महत्त्वाचा जलमार्ग आहे. या युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांद्वारे होणारी तेल वाहतूक विस्कळीत झाल्याने जागतिक पातळीवर कच्चे तेल व गॅस पुरवठ्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. याचा फटका भारतालाही बसत आहे. भारतातील अनेक शहरांत एलपीजी गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. देशात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अनेक व्यवसाय संकटात आले आहेत.
राहुल गांधींकडून चिंता व्यक्त
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी काल लोकसभेत केंद्र सरकारला अनेक सवाल विचारले. मध्य पूर्वेत युद्ध सुरू आहे. या युद्धाचे दूरगामी परिणाम होत आहेत. आपल्याला लागणारे कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचा खूप मोठा भाग हा होर्मुझ सामुद्रधुनीच्या मार्गाने येतो. ती बंद करण्यात आली आहे. भारतातील अनेक शहरांत सध्या गॅसचा तुटवडा जाणवत आहे, तसेच अनेक रेस्टॉरंट्स बंद करण्याची वेळ आली आहे. तसेच घरगुती एलपीजी गॅस पुरवठा बंद होणार याबाबतही लोकांत भीती आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
एलपीजी उत्पादनात 28 टक्क्यांनी वाढ
देशावर ओढवलेल्या ऊर्जा संकटावर केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी काल महत्त्वाची माहिती दिली. गेल्या पाच दिवसांत रिफायनरी निर्देशांद्वारे एलपीजी उत्पादनात 28 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. देशातील 33 कोटी कुटुंबांच्या, विशेषतः गरीब कुटुंबांच्या स्वयंपाकघरात गॅसचा तुटवडा भासणार नाही, ही सरकारची प्राथमिकता आहे. देशातील तेल शुद्धीकरण कारखाने त्यांच्या पूर्ण क्षमतेने काम करत आहेत. अनेक ठिकाणी ही क्षमता 100 टक्क्यांच्याही वर गेली आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेल, केरोसीन, एटीएफ किंवा इंधन तेलाचा कोणताही तुटवडा नाही, असे देशात गॅस सिलिंडरचा तुटवडा असल्याच्या अफवांना पूर्णविराम देताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले
.
ग्रामीण व शहरी भागासाठी वेगळा नियम
देशभरात सिलिंडर बुकिंगसाठी 21 दिवसांचा कालावधी निश्चित होता, जो अलीकडे 25 दिवसांपर्यंत वाढवण्यात आला होता. आता ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागांसाठी वेगवेगळी कालमर्यादा ठरवण्यात आली आहे. नवीन व्यवस्थेनुसार ग्रामीण भागातील ग्राहकांना 45 दिवसांनंतर दुसऱ्या सिलिंडर बुकिंग करता येणार आहे, तर शहरी भागात 25 दिवसांचा कालावधी ठेवण्यात आला आहे. सरकारच्या मते, या निर्णयामुळे गॅस पुरवठ्यावर अचानक पडणारा दबाव कमी होण्यास मदत होईल.