Home Featured गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांची धावाधाव

गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांची धावाधाव

0

राज्यात घरगुती गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा; आढावा घेतल्यानंतर मुख्य सचिवांनी केले आश्वस्त; काही ठिकाणी लागल्या रांगा

राज्याचे मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू यांनी काल एका उच्चस्तरीय बैठकीत राज्यातील एलपीजी गॅस सिलिंडर पुरवठ्याचा आढावा घेतला. राज्यात एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा असून, घरगुती ग्राहकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. राज्यात एलपीजीचा पुरेसा साठा असल्याचे सांगितले जात असले तरी काल मडगाव, डिचोली आणि पेडणे यासह अन्य काही भागांत गॅस एजन्सीबाहेर सिलिंडर मिळवण्यासाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
राज्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे घरगुती गॅस ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. राज्यात घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा होण्याची शक्यता व्यक्त केली असल्याने घरगुती ग्राहकांकडून गॅस सिलिंडर मिळविण्यासाठी गॅस एजन्सीच्या कार्यालयात गर्दी केली जात आहे. गॅस एजन्सीकडून बुकिंग पद्धतीने सिलिंडरसाठी नोंदणी करून घेतली जात आहे. ग्राहकांनी संयम बाळगावा त्यांना घरगुती गॅस सिलिंडर उपलब्ध होतील, असे गॅस एजन्सीकडून सांगितले जात आहे.
या बैठकीला इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियमचे अधिकारी यांच्याबरोबर नागरी पुरवठा खात्याचे सचिव संजीव गडकर, पोलीस महानिरीक्षक के. आर. चौरासिया, उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव, दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस्‌‍, नागरी पुरवठा खात्याचे संचालक जयंत तारी व इतर वरिष्ठ सरकारी अधिकारी यांची उपस्थिती होती.

योग्य माहिती पोचवा
गॅस सिलिंडरबाबत योग्य माहिती ग्राहकांपर्यत पोचविण्याची सूचना करण्यात आली आहे. ग्राहकांत अफवा पसरू नये यासाठी योग्य माहिती देण्याची सूचना करण्यात आली आहे. गॅस सिलिंडरचे वितरण सुरूळीत करण्यासाठी गरज भासल्यास पोलीस संरक्षण उपलब्ध करण्याचे ठरविण्यात आले आहे. जिल्हा आणि तालुका पातळीवर जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकाऱ्यांना गॅस पुरवठ्याबाबत योग्य माहिती देऊन जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आला आहे.

मडगावात ग्राहकांच्या रांगा

आखाती देशांतील युद्धामुळे स्वयंपाक गॅसचा तुटवडा होण्याची शक्यता असल्याने मडगाव येथे गॅस एजन्सींच्या दुकानांबाहेर काल ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी 6 वाजल्यापासून विविध गॅस एजन्सीसमोर ग्राहक रांगेत उभे होते. सध्याच्या घडीला घरगुती गॅस सिलिंडर मिळत आहेत; परंतु व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा पूर्णत: बंद करण्यात आला आहे.

येथील स्टेशन रोडवरील एका एजन्सीच्या दुकानाबाहेर काल भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. गॅस सिलिंडरसाठी बुकिंग करुनही तो मिळाला नसल्याच्या तक्रारी समोर आल्या. आताही प्रत्येक गॅस सिलिंडरवर 500 ते 700 रुपये जादा घेऊन काळ्या बाजारात मिळत असल्याची तक्रार आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट यांना व्यावसायिक गॅस पुरवठा बंद झाल्याने कित्येकांना ती बंद करण्यात येण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे हॉटेलमालकांनी सांगितले.

पेडण्यातही सिलिंडरसाठी गर्दी

व्यावसायिक गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण झाल्यामुळे घरगुती गॅस सिलिंडर मिळावेत, यासाठी पेडण्यातील गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्याचे चित्र काल दिसून आले. एरव्ही वाहनांतून घरोघरी गॅस सिलिंडर पोहोचवला जातो; मात्र सध्या काहीसा तुटवडा असल्याने ज्यांना नितांत आवश्यकता आहे, त्यांना तो मिळत नसल्याने त्यांनी एजन्सीसमोर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने हॉटेल्स, रेस्टॉरंट चालकांसमोर संकट उभे ठाकले आहे. काहींनी तर आपल्या दररोजच्या मेनूमधून काही पदार्थ कमी केले आहेत.

प्राधान्यक्रम निश्चित
राज्यातील घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत ठेवला जाणार आहे. त्यासाठी गरज भासल्यास व्यावसायिक वापरावर काही प्रमाणात निर्बंध लागू केले जाऊ शकतात. राज्यातील इस्पितळे, संरक्षण दल, शैक्षणिक संस्था यांना प्राधान्यक्रमाने गॅस सिलिंडर उपलब्ध केले जाणार आहेत, असे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय बैठकीत निश्चित करण्यात आले.

तेल कंपन्यांनी दिली उपाययोजनांची माहिती
तेल कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मुख्य सचिव आणि इतर सदस्यांना त्यांच्याकडे असलेल्या गॅस सिलिंडर साठ्याबाबत, तसेच पुरवठा आणि गॅस सिलिंडर पुरवठा कमी होऊ नये म्हणून केलेल्या उपायांची माहिती बैठकीत देण्यात आली.