Home बातम्या नव्या ॲपआधारित धोरणानंतर जुने टॅक्सी धोरण रद्द होणार

नव्या ॲपआधारित धोरणानंतर जुने टॅक्सी धोरण रद्द होणार

0

>> मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती; टॅक्सीव्यावसायिकांच्या प्रश्नावर तोडग्याकरिता समितीच्या अहवालाची प्रतीक्षा

राज्यात ॲपआधारित टॅक्सी सेवा सुरू झाली की, ॲपआधारित टॅक्सीचे धोरण तयार करण्यात येणार असून, जुने टॅक्सी धोरण रद्द केले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल विधानसभेत दिली. प्रश्नोत्तराच्या तासाला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी राज्यातील टॅक्सीव्यावसायिकांचा प्रश्न उपस्थित केला असता, त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी वरील माहिती दिली.

टॅक्सी ॲग्रिगेटरने राज्यातील टॅक्सीव्यावसायिकांसाठी जी मार्गदर्शक तत्वे तयार केलेली आहेत, ती जाचक असल्याने या मार्गदर्शक तत्वांना असलेला विरोध लक्षात घेऊन ती रद्द केली जावी, अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली होती.

यावेळी उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी राज्यात ॲपआधारित टॅक्सी सेवा सुरू झाली की टॅक्सीसाठीचे नवे धोरण तयार करण्यात येणार असून, सध्याचे धोरण जे शीतपेटीत ठेवले आहे, ते रद्द करण्यात येणार असल्याची माहिती दिली. टॅक्सीव्यावसायिकांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केलेली असून, या समितीचा अहवाल आल्यानंतर त्यांच्या प्रश्नावर कसा तोडगा काढावा, याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

आलेमाव-गुदिन्हो
यांच्यात शाब्दिक चकमक
तत्पूर्वी बोलताना युरी आलेमाव यांनी टॅक्सी ॲग्रिगेटरची मार्गदर्शक तत्त्वे रद्द करण्याची मागणी केली होती. तसेच राज्यातील टॅक्सीव्यावसायिकांच्या समस्या समजून घेऊन त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांच्याकडे केली होती. मात्र, यावेळी गुदिन्हो यांनी आलेमाव यांना यासंबंधी ठोस आश्वासन देण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याच्या पार्श्वभूमीवर हस्तक्षेप करताना मुख्यमंत्र्यांनी जुने टॅक्सी धोरण रद्द करून नवे टॅक्सी धोरण तयार करण्यात येणार असल्याचे विधानसभेत सांगितले.

टॅक्सी अग्रिगेटरला आक्षेप
यावेळी युरी आलेमाव यांनी राज्यातील टॅक्सीव्यावसायिकांचा स्पीड गव्हर्नर, टॅक्सी मीटर आदींना विरोध असल्याचे सांगितले. तसेच ‘गोवा माईल्स’ आणि ‘गोवा टॅक्सी ॲप’ आदींसंबंधीही त्यांच्या मनात विविध प्रश्न व शंका असल्याचे आलेमाव यांनी निदर्शनास आणून दिले. टॅक्सी ॲग्रिग्रेटरच्या मार्गदर्शक तत्त्वांसंबंधी टॅक्सीव्यावसायिकांनी 3802 एवढे आक्षेप नोंदवले असल्याची माहिती आलेमाव यांनी दिली. फक्त 290 जणांनी त्यांच्या मार्गदर्शक तत्वांना पाठिंबा व्यक्त केला आहे. त्यामुळे सरकारने टॅक्सी ॲग्रिगेटरची मार्गदर्शक तत्त्वे व एकूणच धोरण रद्द करावे, अशी मागणी आलेमाव यांनी केली.

टॅक्सीचालक पर्यटनाचे राजदूत
टॅक्सीव्यावसायिकांच्या प्रश्नावरून यावेळी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो व युरी आलेमाव यांच्यात बरीच शाब्दिक चकमक झाली. राज्यातील टॅक्सीचालक हे आमचे पर्यटन क्षेत्रातील राजदूत आहेत. राज्यात भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून त्यांच्या वाट्याला केवळ दु:खच आले असल्याची टीका युरी आलेमाव यांनी चर्चेवेळी केली.

टॅक्सीव्यावसायिकांकडून फसवणूक
तोडगा काढण्यासाठी या टॅक्सीव्यावसायिकांशी कित्येक वेळा बैठका घेण्यात आल्या. राज्यात ॲपआधारित टॅक्सी सेवा नसल्याने पर्यटकांची गैरसोय आणि फसवणूक होते. टॅक्सीव्यावसायिकांकडून पर्यटकांची जी फसवणूक व लुबाडणूक केली जाते. त्यामुळे गोव्याची प्रतिमा खराब होऊ लागली आहे, असे आलेमाव यांच्या टीकेला उत्तर देताना वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो म्हणाले.

तोडगा निघाला होता; पण…
‘ओला’ आणि ‘उबर’ या टॅक्सी सेवांनाही टॅक्सीव्यावसायिक विरोध करीत आहेत. बोलणी व तोडग्यासाठी त्यांच्या वेगवेगळ्या 36 संघटनांनाही बैठकीसाठी एकत्र आणण्यात आले होते. शेवटच्या बैठकीत तोडगा निघाला होता; मात्र, ऐनवेळी टॅक्सीव्यावसायिकांच्या एका छोट्या गटाने खोडा घातल्याने सगळेच फिस्कटल्याचे गुदिन्हो म्हणाले.