गेल्या 10 वर्षांत राज्यावरील कर्जाचा बोजा हा आता दुप्पट झालेला असून, या घडीला राज्याच्या डोक्यावर 35,312 कोटी रुपयांचे कर्ज असल्याची माहिती काल विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी गोवा विधानसभेत दिली. सोबतच, या वाढत्या कर्जामुळे कर्जावरील परतफेडीचा आकडा हा आता 1320 कोटी रुपयांवरून 3300 कोटी रुपयांवर जाणार असल्याचे त्यांनी काल प्रश्नोत्तराच्या तासाला निदर्शनास आणून दिले. हे कर्ज कमी करण्यासाठी किंवा फेडण्यासाठी सरकारकडे कोणतीही योजना नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केला.
प्रश्नोत्तराच्या तासाला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्टा, कार्लूस फेरेरा, व्हेन्झी व्हिएगस, वीरेश बोरकर यांनी सरकारी कर्जासंबंधीचा प्रश्न विचारला होता.
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हे कर्ज विकासकामांसाठी घेतलेले असून, ते फेडण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. केंद्राकडूनही राज्याला बिनव्याजी कर्ज मिळाले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. केंद्र सरकारच्या भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य या योजनेखाली गोव्यात येत्या आर्थिक वर्षांत 4500 ते 5000 कोटींजे कर्ज मिळणार असून, ते व्याजमुक्त असेल आणि ते फेडण्यासाठीचा अवधी हा 50 वर्षे एवढा असेल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
महोत्सवांवर 677 कोटींचा खर्च
2022 सालापासून आतापर्यंत गोवा सरकारने राज्यात वेगवेगळ्या महोत्सवांचे आयोजन करण्यासाठी 677 कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप युरी आलेमाव यांनी यावेळी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गोव्यात झालेल्या ‘विकसित भारत’ या एका तासासाठीच्या कार्यक्रमावर सरकारने तब्बल 13 कोटी रुपये खर्च केल्याचा आरोपही त्यांनी केला.