Home बातम्या उपोषण मागे घेतल्यानंतर बोरकरयांच्यावर इस्पितळात उपचार सुरू

उपोषण मागे घेतल्यानंतर बोरकरयांच्यावर इस्पितळात उपचार सुरू

0

सहा दिवसांच्या आमरण उपोषणामुळे प्रकृती खालावल्याने हे उपोषण मागे घेतल्यानंतर गुरुवारी मध्यरात्री सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांना पणजीतील एका खासगी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले. बोरकर यांच्यासोबत आमरण उपोषण करणाऱ्या तुषार गावस यांनाही इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल इस्पितळात जाऊन वीरेश बोरकर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

आमदार वीरेश बोरकर यांनी टीसीपीच्या कलम 39 अ खाली मान्यता दिलेले राज्यातील सर्व प्रस्ताव रद्द करावे, कलम 39 अ रद्द करावे, या मागणीसाठी शनिवार 21 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण पुकारले होते. अखेर नगरनियोजन खात्याने सांत आंद्रे मतदारसंघातील टीसीपीच्या कलम 39 अ खाली मान्यता दिलेले आणि प्रस्तावित प्रस्ताव निलंबित करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर गुरूवारी रात्री 11 वाजता त्यांनी उपोषण मागे घेतले.

आरजीपीचे प्रमुख मनोज परब यांनी शुक्रवारी संध्याकाळी आरजीपीच्या कार्यालयात एक पत्रकार परिषद घेऊन आमदार वीरेश बोरकर यांच्या टीसीपीच्या कलम 39 अ च्या विरोधातील आंदोलनाला पाठिंबा देणारे राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांचे आभार मानले.