पणजी पोलिसांनी टीसीपीच्या कलम 39 अ च्या विरोधात 23 फेब्रुवारीला आयोजित महाआंदोलनात सहभागी झालेले योगेश गोवेकर आणि गजानन तिळवे यांना नोटीस पाठवून शनिवार दि. 28 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता ताळगाव येथील पोलीस चौकीवर चौकशीसाठी उपस्थित राहण्याची नोटीस काल बजावण्यात आली. दोघांनी चौकशीसाठी उपस्थित राहून चौकशी अधिकाऱ्याला सहकार्य करावे, असे नोटिसीमध्ये म्हटले आहे.
सांत आद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी टीसीपीच्या कलम 39 अ च्या विरोधात सुरू केलेल्या उपोषण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी 23 फेब्रुवारीला पणजीतील आझाद मैदानावर महाआंदोलनाचे आयोजन केले होते. येथील आझाद मैदानावर आंदोलक एकत्र झाल्यानंतर सर्वांनी मंत्री विश्वजीत राणे यांच्या ताळगाव येथील बंगल्याकडे कूच केली होती. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी करंजाळे- दोनापावल येथील सर्कलजवळ रस्त्यावर बॅरिकेड्सच्या साहाय्याने रस्ता बंद केला होता. त्यावेळी योगेश गोवेकर व इतरांनी रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी पोलिसांशी हुज्जत घातली होती. तसेच, रस्त्यावरील बॅरिकेड्स बाजूला केल्या होत्या, असा पोलिसांचा दावा आहे.