बर्च अग्नितांडव प्रकरण; हणजूण पोलिसांनी नोंदवली 305 जणांची साक्ष; म्हापसा येथील प्रथम श्रेणी न्यायालयात आरोपपत्र दाखल
राज्यासह देशभरात गाजलेल्या 25 जणांचा बळी घेणाऱ्या हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन या नाईटक्लबमधील अग्नितांडव प्रकरणात हणजूण पोलिसांनी 13 संशयित आरोपींच्या विरोधात सुमारे 4 हजार 150 पानांचे आरोपपत्र म्हापसा येथील प्रथम श्रेणी न्यायालयात काल दाखल केले. पोलिसांनी या प्रकरणात 305 जणांच्या साक्षी नोंदविल्या आहेत.
गतवर्षी 6 डिसेंबर 2025 रोजी रात्री 11.45 वाजता बर्च या नाईटक्लबमध्ये भीषण आग लागल्याने 25 जणांचा बळी गेला होता. त्यात नाईटकल्बचे कर्मचारी आणि पर्यटकांचा समावेश होता. या नाईटक्लबने योग्य काळजी आणि खबरदारी न घेता, तसेच अग्निसुरक्षा उपकरणे आणि इतर सुरक्षा उपकरणांची सोय न करताच पायरोफ्लेमसारख्या आगीस कारणीभूत ठरणाऱ्या उपकरणांचा वापर केल्याने आगीची गंभीर आगीची घटना घडली होती. पायरोफ्लेममधून बाहेर पडणाऱ्या अग्निज्वाळांमुळे क्लबला आग लागली आणि त्यामध्ये 25 निष्पाप लोकांचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण राज्यसह देशभरात गाजले होते. घटनेनंतर पलायन लुथरा बंधूंना आठवडाभरातच थायलंडमध्ये ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण करून त्यांना भारतात आणण्यात आले होते.
सदर बार आणि रेस्टॉरंट/क्लबमध्ये आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी तळमजल्यावर तसेच डेक फ्लोअरवर आपत्कालीन दरवाजा नव्हता. त्यामुळे आतमधील कर्मचारी व पर्यटकांना आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडता आले नाही. सदर बार आणि रेस्टॉरंट/क्लब सक्षम अधिकाऱ्यांकडून परवानगी/परवाने न घेता कार्यरत असल्याचे आढळून आले होते.
पोलिसांनी भारतीय न्यायिक संहिता 2023 चे कलम 338, 336(3), 340(2), 61(2) 238, 241, 3(7) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलेल्या 13 जणांमध्ये क्लबचे मालक सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा यांच्याबरोबरच सहमालक अजय गुप्ता, कार्यकारी व्यवस्थापक राजीव मोडक, विवेक सिंग, ब्रिजय कुमार सिंग, प्रियांशू ठाकूर, राजीव सिंघानिया, माजी सरपंच रोशन रेडकर, बडतर्फ पंचायत सचिव रघुवीर बागकर, मयुर कोलवाळकर, महंमद बैत्री, सुरेंद्र कुमार खोसला यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यातील ब्रिटिश नागरिक असलेल्या सुरेंद्र कुमार खोसला याला अजूनपर्यंत अटक करण्यात आलेली नाही. त्याच्याविरोधात अजामीन अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. तसेच, ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आलेली आहे.
आरोपपत्र दाखल केलेल्यांपैकी लुथरा बंधू, अजय गुप्ता, रोशन रेडकर, रघुवीर बागकर, राजीव मोडक, विवेक सिंग, ब्रिजय सिंग हे न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यातील सौरभ आणि गौरव लुथरा, अजय गुप्ता हे तिन्ही संशयित आरोपी हे मेसर्स बीईग जीएस हॉस्पिटॅलिटी गोवा हडफडे एलएलपीचे भागीदार आणि बर्च बाय रोमियो लेन क्लबचे मालक आहेत.