Home बातम्या 2027 ची जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने

2027 ची जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने

0

सरकारकडून सीएमएमएस ह्या समर्पित डिजिटल संकेतस्थळाची निर्मिती

पारंपरिक कागद-पेनवर आधारित जनगणनेला पूर्णविराम देत, 2027 ची जनगणना ही पूर्णपणे डिजिटल स्वरुपाची असेल. या मोहिमेसाठी ‘सेन्सस मॅनेजमेंट अँड मॉनिटरिंग सिस्टम’ (सीएमएमएस) हे एक समर्पित डिजिटल संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. भारताच्या इतिहासातील ही पहिलीच संपूर्णपणे डिजिटल जनगणना असणार आहे.
भारताचे महानिबंधक (आरजीआय) मृत्युंजय कुमार नारायण यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या परिपत्रकात म्हटले की, ‘या संकेतस्थळाद्वारे वापरकर्ते तयार करणे, प्रशिक्षण मॉड्यूल हाताळणे, ओळखपत्रे तयार करणे आणि नेमणूक पत्रे जारी करणे यांसारखी कामे सुलभ होतील. डिजिटल पद्धतीने गोळा केलेला डाटा या जनगणना प्रक्रियेच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण आणि परिवर्तनकारी पाऊल आहे.’

‘सीएमएमएस’ हे ‘क्लिपबोर्ड’ आणि ‘कार्बन कॉपी’ची जागा घेईल. त्याऐवजी हातातील उपकरणे (हँडहेल्ड डिव्हाइसेस), जिओटॅग मॅपिंग टूल्स आणि एका मध्यवर्ती वेब-आधारित ‘कमांड प्लॅटफॉर्म’चा वापर केला जाईल. विशेष सॉफ्टवेअरच्या मदतीने 32 लाख क्षेत्रीय कर्मचारी (गणक आणि पर्यवेक्षक) कोट्यवधी कुटुंबांकडून लोकसंख्याशास्त्रीय, सामाजिक आणि आर्थिक डाटा संकलित करतील. हा डाटा ‘सीएमएमएस’द्वारे त्वरित पाठवला, एकत्रित केला आणि तपासला जाऊ शकतो, ज्यामुळे डाटा संकलनातील त्रुटी सुधारण्यासाठी लागणारा वेळ कमी होईल.

केंद्र सरकारने 2027 च्या जनगणनेसाठी 11,718 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. यावेळेस प्रथमच जातीनिहाय गणनेचा समावेश असेल. पहिला टप्पा एप्रिल ते सप्टेंबर 2026 यादरम्यान असून, त्यात घरांची यादी केली जाईल. दुसरा टप्पा फेब्रुवारी 2027 मध्ये होण्याची शक्यता असून, त्यात प्रत्यक्ष लोकसंख्या गणना केली जाईल. यामध्ये नागरिकांना स्वतःहून माहिती नोंदवण्याचा पर्यायही उपलब्ध करून दिला जाईल.
आगामी जनगणनेत डाटावदा संकलनाची गुणवत्ता, कार्यक्षमता आणि वेळेत उपलब्धता वाढवण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जाईल. हे प्रक्रियेच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे, असे महानिबंधक मृत्युंजय कुमार नारायण यांनी म्हटले आहे.