सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एनसीईआरटीच्या इयत्ता आठवीच्या सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकातील ‘न्यायिक भ्रष्टाचार’ या धड्याच्या वादावर सुनावणी घेतली. न्यायालयाने वादग्रस्त धड्यावर संपूर्ण बंदी घालण्याचे आदेश दिले, तसेच पुस्तकाचे प्रकाशन आणि विक्री प्रतिबंधित केली. तसेच पुस्तकाच्या सर्व छापील आणि डिजिटल प्रती तात्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले.
या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शिक्षण मंत्रालयाच्या सचिवांना आणि इतर अधिकाऱ्यांना नोटीस बजावल्या. अभ्यासक्रमाशी संबंधित बैठकांचे रेकॉर्ड आणि पुस्तकाच्या लेखकांची नावे मागितली. जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करावी, असे सरन्यायाधीशांनी सांगितले. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. न्यायालयाने एनसीईआरटीला फौजदारी अवमानाचा इशाराही दिला. सुनावणीदरम्यान, शिक्षण मंत्रालयाने बिनशर्त माफी मागितली.