शिरगाव-डिचोली येथील आगामी वार्षिक श्री देवी लईराई जत्रोत्सवातील गर्दी व्यवस्थापनासाठी व्यापक योजना सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने गोवा सरकारला काल दिले. गतवर्षी जत्रोत्सवादरम्यान झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. गतवर्षीच्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे 80 लोक जखमी झाले होते. यावर्षी जत्रोत्सव 21 एप्रिल रोजी होणार असल्याने सुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची निकड याचिकाकर्त्यांनी अधोरेखित केली. या प्रकरणी पुढील सुनावणी 10 मार्च रोजी घेतली जाणार आहे.