Home Featured महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदीसुनेत्रा पवार यांची वर्णी शक्य

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदीसुनेत्रा पवार यांची वर्णी शक्य

0

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या पदावर सुनेत्रा पवार यांची निवड होण्याचे संकेत मिळत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांच्याशी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी चर्चेच्या हालचाली सुरू केल्या असून, त्यांच्याकडून होकार मिळताच पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) सत्तेचा आणि संघटनेचा गाडा पुन्हा रुळावर आणण्यासाठी हालचाली तीव्र केल्या आहेत. अजित पवारांच्या अकाली निधनामुळे राष्ट्रवादीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. कार्यकर्ते अस्वस्थ आहेत, विविध चर्चा केल्या जात आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री केले तर परिस्थिती निवळू शकते, असे अनेक नेत्यांचे म्हणणे आहे.राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करण्यासाठी शनिवारी आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर सुनेता पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदी शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवार यांचा राज्य मंत्रिमंडळात लगेचच समावेश करण्यात येणार आहे. हा शपथविधीचा समारंभ अत्यंत साधेपणाने पार पाडला जाईल.

काल राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. तेव्हा पक्षाच्या वतीने सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. अजित पवारांकडील वित्त व नियोजन, उत्पादन शुल्क ही खाती पक्षाकडेच कायम राहावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्याचे समजते.