राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचा भाजपच्या गाभा समितीच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीत सल्ला
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचे काल गोव्यात आगमन झाले. या दौऱ्यादरम्यान नबीन यांनी पणजीत भाजपच्या गाभा समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. गोव्यात भाजपची संघटना सक्रिय व मजबूत असून, कार्यकर्त्यांची मोठी फळी हीच पक्षाची खरी ताकद आहे. राज्यातील जनतेशी संपर्क वाढवावा, तसेच सरकारच्या सर्व योजना राज्यातील तळागाळातील लोकांपर्यंत पोचतील याकडे खास लक्ष द्यावे, असा सल्ला नितीन नबीन यांनी दिला. विधानसभा निवडणुका जवळ आल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षजनांनी समन्वयाने काम करण्याची गरजही त्यांनी गाभा समितीच्या नेत्यांशी बोलताना व्यक्त केली.
राजधानी पणजीत झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, भाजपचे राष्ट्रीय महासचिव तरुण चुंग, तसेच गाभा समितीतील अन्य सर्व नेते उपस्थित होते. त्यात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मंत्री विश्वजीत राणे, रमेश तवडकर, माविन गुदिन्हो, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे आदी नेत्यांचा समावेश होता.
तत्पूर्वी, काल सकाळी नितीन नबीन यांचे मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले, तेव्हा त्यांचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी स्वागत केले. तद्नंतर 12 च्या दरम्यान त्यांचे पणजीतील भाजप मुख्यालयात आगमन झाले असता तेथे त्यांचे पक्ष कार्यकर्ते, पदाधिकारी व पक्षाच्या नेत्यांनी जंगी स्वागत केले. त्यासाठी भाजप मुख्यालय असलेल्या इमारतीखाली खास मंच उभारण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री, खासदार, मंत्री तसेच पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नितीन नबीन यांनी काही खासगी कार्यक्रमांबरोबरच भाजपच्या मडगाव येथील दक्षिण गोवा कार्यालयालाही भेट दिली. तसेच यावेळी पक्षाच्या दक्षिण गोवा जिल्हा समितीच्या सदस्यांशीही संवाद साधला. तसेच वेर्णे येथील श्री देवी महालसा नारायणी देवस्थानलाही भेट
दिली.
आज ताळगावात कार्यकर्ता मेळावा
नितीन नबीन हे आज (दि. 31) सकाळी 11.30 वाजता ताळगाव येथे कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करणार आहेत. 2027 सालच्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग ते या मेळाव्यातून फुंकणार आहेत.
आज उत्तर गोव्यात दौरा
नितीन नबीन हे शनिवारी उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षा रेश्मा बांदोडकर यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेणार आहेत. तद्नंतर सकाळी 10 च्या दरम्यान म्हापसा येथील भाजपच्या उत्तर गोवा जिल्हा कार्यालयाला भेट देणार आहेत. तद्नंतर सकाळी 11.30 वाजता ते माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या समाधीस्थळी तसेच राज्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या समाधीस्थळी जाऊन या दोन्ही दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली वाहणार आहेत. तद्नंतर दुपारी 12 ते 1 या दरम्यान ताळगाव येथील समाज सभागृहात भाजप कार्यकर्त्यांना मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत.