Home Featured चिंबल ग्रामस्थांचेआज महाआंदोलन

चिंबल ग्रामस्थांचेआज महाआंदोलन

0

युनिटी मॉल प्रकल्प इतरत्र हलवण्याच्या घोषणेनंतरही आंदोलनावर ठाम

तोयार तळ्याजवळील प्रस्तावित युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ प्रकल्प रद्द करण्याच्या पर्यटन खात्याच्या निर्णयाचे चिंबल येथील ग्रामस्थांनी स्वागत केले आहे; मात्र युनिटी मॉल प्रकल्प हा तोयार तळ्याच्या प्रभाव क्षेत्रात किंवा पाणलोट क्षेत्रात येत नाहीत ही राज्य सरकारची भूमिका ग्रामस्थांना मान्य नाही. त्याचबरोबर चिंबल ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी 30 जानेवारीला महाआंदोलन छेडण्याची घोषणा केली होती, त्यावर ग्रामस्थ ठाम असून, ते महाआंदोलन आज पणजीत होणार आहे. आंदोलकांचे प्रमुख गोविंद शिरोडकर आणि अजय खोलकर यांनी काल एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी एका उच्चस्तरीय बैठकीत चिंबल येथील युनिटी मॉल प्रकल्पाच्या विषयावर सविस्तर चर्चा केली. त्यानंतर नागरिकांचा या प्रकल्पाला होणारा वाढता विरोध लक्षात घेऊन पर्यटन खात्याला युनिटी मॉल प्रकल्प अन्य ठिकाणी हलविण्याचे
निर्देश दिले.

तोयार तळे प्रभाव क्षेत्र, पाणलोट क्षेत्रात येत नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य आम्हाला मान्य नाही, असे गोविंद शिरोडकर यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी वरीत वक्तव्य करताना चिंबल ग्रामस्थांना विश्वासात घेतले नाही. राज्य सरकारने तोयार तळ्याचे प्रभाव क्षेत्र, पाणलोट क्षेत्राबाबत एकतर्फी निर्णय घेतला आहे, असेही शिरोडकर यांनी सांगितले.

संयुक्त सर्वेक्षणानंतर तयार केलेल्या मसुदा अहवालावर काम अद्याप सुरू आहे. 30 जानेवारी रोजी प्रस्तावित महाआंदोलन वेळापत्रकानुसार होणार आहे. कारण आमचा निषेध केवळ या दोन प्रकल्पांपुरता मर्यादित नाही तर संपूर्ण गोव्यात होणाऱ्या आंदोलनांना पाठिंबा देण्यासाठी आहे, असेही गोविंद शिरोडकर
यांनी सांगितले.

सरकारी अधिकाऱ्यांनी चिंबल ग्रामस्थांना विश्वासात घेतलेले नाही. युनिटी मॉल प्रकल्प हा तोयार तळ्याच्या प्रभाव क्षेत्रात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर केलेल्या संयुक्त सर्वेक्षणाचा अहवाल देण्यात आलेला नाही. आमच्या तज्ज्ञांना सुध्दा त्यांनी या गोष्टी सांगितलेल्या नाहीत, असेही शिरोडकर म्हणाले.

तोयार तळ्याजवळ यापुढे कोणताही प्रकल्प नको
युनिटी मॉल प्रकल्प प्रभाव क्षेत्रात असून, या विषयावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. आयटी पार्कनंतर आता युनिटी मॉल प्रकल्प हलविण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे तोयार तळ्याच्या परिसरात यापुढे कुठलाही प्रकल्प येता कामा नये, याबाबत सरकारकडून स्पष्ट आश्वासन घेतले जाणार आहे, असेही गोविंद शिरोडकर यांनी सांगितले.