Home Featured कलाटणी

कलाटणी

0

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पार्थिवावर काल प्रचंड जनसागराच्या उपस्थितीत अंतिम संस्कार झाले. अजित पवार अशा आकस्मिक जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला एक फार मोठी कलाटणी मिळाली आहे. पवार कुटुंबाला, राष्ट्रवादी काँग्रेसला, पश्चिम महाराष्ट्राला, महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या महायुतीला, त्यातील भारतीय जनता पक्षाला, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला, अशा सर्वांनाच आता नव्या समीकरणांची मांडणी करणे अपरिहार्यपणे भाग पडणार आहे. अजित पवार यांच्या जाण्याने पवार कुटुंबाला तर मोठा हादरा बसलाच आहे, कारण जरी राजकीयदृष्ट्या ह्या कुटुंबात दोन गट पडले, तरी शरद पवारांच्या नंतर एका बाजूने सुप्रिया सुळे आणि दुसऱ्या बाजूने अजित पवार ह्या शरद पवारांचा राजकीय वारसा पुढे घेऊन चालले होते, त्या रथाचे एक चाकच नाहीसे झाले आहे. अजित पवार यांचे राजकारण एकखांबी होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये त्यांच्यानंतर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे असे एकाहून एक बलदंड नेते जरी असले, तरी अजित पवारांचा उत्तराधिकारी म्हणून यापैकी कोणाकडेही पाहिले जात नाही. त्यांच्या स्वतःच्या कुटुंबीयांचे म्हणाल तर पत्नी सुनेत्रा गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्या. त्यानंतर त्यांची वर्णी राज्यसभेवर जरी लावली गेली असली, तरी राजकीय पूर्वानुभव त्यांना नाही. अजित पवार यांचे पुत्र – पार्थ आणि जय यापैकी पार्थ यांनी मावळमधून मागील निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांना मतदारांनी तेव्हा स्वीकारले नव्हते. शिवाय अलीकडेच त्यांचा जमीन घोटाळा चर्चेत आला होता. जय हे अद्याप राजकारणात नाहीत. ह्या पार्श्वभूमीवर आता अजित पवारांच्या पक्षाचे नेतृत्व कोण स्वीकारणार हा मोठा प्रश्न आहे. पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष असलेले प्रफुल्ल पटेल किंवा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे पक्षाची धुरा तात्पुरती वाहतील, परंतु पवार कुटुंबातील उत्तराधिकारी निवडल्याखेरीज हा गट एकसंध राहणे कठीण बनेल. मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार अजूनही राजकारणात आहेत. आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांच्याकडे परत जाण्याचे वेधही अजित पवार गटाच्या आमदारांना लागू शकतात, किंवा सत्तेसाठी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा विचारही काहींच्या मनात बळावू शकतो. भाजपलाही अर्थातच ते हवे असेल. एकनाथ शिंदेंच्या गटाच्या सौदेबाजीला शह देण्यासाठीच अजित पवारांचे बंड भाजपने घडवले होते. त्यामुळे आता अजित पवारांचे नसणे हे एकनाथ शिंदेंच्या पथ्थ्यावर पडू देऊन भाजपला चालणार नाही. त्यामुळे सत्तेचा समतोल राखण्यासाठी भाजप नक्कीच या संधीचा लाभ घेण्याचा प्रयत्न करील. दुसरीकडे, शरद पवार गट आणि अजित पवार गट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी नुकतेच एकत्र आले होते. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक त्यांनी एकत्र लढवली होती, मात्र त्याचा फायदा झाला नाही. आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याचा विचार करू शकतात, परंतु मग राजकीय भूमिका काय राहील हा प्रश्न उद्भवेल. पवार कुटुंबीयांमध्ये पवारांच्या पक्षामध्ये सुप्रिया सुळेंप्रमाणेच रोहित पवार हे एक दमदार नेतृत्व उदयास येते आहे. सध्या कर्जत – जामखेडचे आमदार असलेल्या रोहित पवारांना काका अजित पवार यांचा राजकीय वारसा पुढे नेण्याची संधी पश्चिम महाराष्ट्रात आता राहील. रोहित पवार यांच्याकडे उत्तम वक्तृत्व आहे. खुद्द अजित पवार यांच्या मुलांपेक्षा त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी दिसते. काका शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात पद्धतशीरपणे पावले पडताना दिसत आहेत. महायुती सरकारचा विचार करता अजित पवारांची अर्थ, नियोजन ही खाती आता कोणाकडे जाणार हा प्रश्न आहे. अर्थात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ती सांभाळण्यास समर्थ आहेत, परंतु अजित पवार गट ही महत्त्वाची खाती आपल्या हातून जाऊ देईल का हा प्रश्न राहील, कारण राष्ट्रवादीचे बहुतांशी आमदार भाजपकडे आले ते विकासनिधीच्या अपेक्षेने. अजित दादांनी त्याची सूत्रे आपल्या हाती ठेवली होती. आता विकासनिधीसाठी भाजप अडवणूक करील आणि आपले राजकीय अस्तित्व संपवील ही भीती अजित पवार गटाच्या आमदारांना राहील. महाराष्ट्रातील जिल्हा परिषद निवडणुका तोंडावर आहेत. त्या पुढे ढकलल्या जाणार का हाही प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बरीच मोठी उलथापालथ अजित पवारांनंतरच्या काळात घडू शकते. सत्तेची आणि विरोधकांची समीकरणे कशी आणि कुठवर बदलतात हे येणाऱ्या काळात पाहू.