काँग्रेस नेते राहुल गांधी; अमेरिकेने आयातशुल्क लादल्यामुळे भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्रात अस्थिरता
अमेरिकेने लादलेल्या आयातशुल्कामुळे भारतीय वस्त्रोद्योगाला होत असलेल्या नुकसानीवरून काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. अमेरिकन आयातशुल्कामुळे वस्त्रोद्योग प्रचंड अनिश्चिततेत सापडला असून, पंतप्रधानांनी आपल्या दुर्बलतेचा परिणाम अर्थव्यवस्थेवर पडू देऊ नये. अमेरिकेच्या आयातशुल्कामुळे भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्रातील 4.5 कोटींपेक्षा जास्त नोकऱ्या आणि लाखो व्यवसाय धोक्यात आले आहेत, असे राहुल गांधींनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी हरियाणातील गुरुग्रामजवळील एका वस्त्रोद्योग कारखान्याला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी कामगार आणि व्यवस्थापनाशी संवाद साधला. या दौऱ्याचा व्हिडिओ त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर शेअर केला.
भारतातील वस्त्रोद्योग हा रोजगार निर्मितीच्या बाबतीत दुसरे सर्वात मोठे क्षेत्र आहे. भारतीय कपड्यांना जगभर मागणी आहे आणि आपल्या कारागिरांच्या कौशल्याला तोड नाही. मात्र, अमेरिकेने लावलेल्या आयातशुल्कामुळे या क्षेत्रात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे, असे राहुल गांधींनी म्हटले आहे. अमेरिकेने सुमारे 50 टक्के आयातशुल्क लावले आहे. त्यामुळे भारतीय वस्त्रोद्योग आणि निर्यातदार सर्व बाजूंनी पिळले जात आहेत. याचा थेट परिणाम रोजगारावर होत असून, कारखाने बंद पडत आहेत, मागणी कमी होत आहे आणि संपूर्ण क्षेत्रात अस्थिरता पसरली आहे, असेही राहुल गांधींनी नमूद केले.
भारतीय अर्थव्यवस्था मृतावस्थेत
भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत असल्याचा आरोप खासदार राहुल गांधी यांनी केला. पंतप्रधान मोदींनी ना कोणतीही सवलत दिली आहे, ना आयातशुल्कावर चर्चा केली आहे. नोकऱ्यांचा ऱ्हास, कारखाने बंद होणे आणि मागणी कमी होणे, हीच आजच्या ‘डेड इकॉनॉमी’ची वास्तविकता आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.