गोवा हे जागतिक आरोग्य केंद्र बनवण्यासाठी सरकार पावले उचलत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल बांबोळी ‘इंडिया इंटरनॅशनल आयुर्वेद अँड वेलनेस एक्स्पो 2026’चे उद्घाटन केल्यानंतर बोलताना सांगितले. या एक्स्पो आणि शिखर परिषदेमुळे आयुर्वेद व आरोग्य क्षेत्रातील देश-विदेशी तज्ज्ञ, संशोधक, वैद्यकीय पर्यटनाशी संबंधित संस्था एकत्र येत असून ज्ञानाची देवाण-घेवाण होणार असल्याचे ते म्हणाले. याद्वारे नव्या संशोधनाला वेग येणार असून गुंतवणूक वाढीस लागण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. ‘विकसित गोवा’ व ‘स्वयंपूर्ण गोवा’ या राज्य सरकारच्या ज्या संकल्पना आहेत, त्यात आरोग्य व वेलनेस पर्यटनाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बांबोळी येथे सुरू झालेला हा एक्स्पो तीन दिवसांचा असून तो रविवारपर्यंत चालणार आहे. त्यानिमित्त विविध तांत्रिक सत्रे, कार्यशाळा, परिसंवाद व उत्पादनांचे प्रदर्शन होणार आहे. उद्घाटन सोहळ्याला व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांबरोबर राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू, पतंजलीचे आचार्य बाळकृष्ण तसेच जीसीसीआयच्या अध्यक्ष प्रतिमा धोंड आदी मंडळी उपस्थित होती.