Home बातम्या बनावट वाहतूक चलन दंडाच्या संदेशापासून सावधानता बाळगा

बनावट वाहतूक चलन दंडाच्या संदेशापासून सावधानता बाळगा

0

सायबर घोटाळेबाजांकडून नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी बनावट वाहतूक चलन दंड संदेशाचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वाहनचालक आणि नागरिकांनी बनावट वाहतूक चलन दंडाबाबत सतर्क राहण्याचे आवाहन काल केले. अन्यथा, नागरिकांना आर्थिक नुकसान, फोन हॅक किंवा त्यांच्या वैयक्तिक माहितीची चोरी केली जाऊ शकते, असे पोलिसांनी जारी सूचनेत म्हटले आहे.

सायबर घोटाळेबाजांकडून नागरिकांना बनावट वाहतूक दंडाबाबत एसएमएस, व्हॉटस्‌‍अप यांच्या माध्यमातून वाहतूक दंडाची रक्कम प्रलंबित असल्याच्या सूचना पाठविल्या जात आहेत. त्या घोटाळेबाजांनी पाठविलेल्या लिंकवर क्लिक केल्यास आर्थिक फसवणूक, मोबाईल फोन हॅक किंवा वैयक्तिक माहितीची चोरी केली जाऊ शकते. सायबर घोटाळेबाजांनी पाठविलेल्या बनावट संदेशावर क्लिक केल्यास फोन थेट फसवणूक करण्यासाठी वापरल्या जात असलेल्या वेबसाईटला जोडला जाणार आहे. सदर वेबसाईट मोबाईलमधील वैयक्तिक माहितीची चोरी करू शकते. घोटाळेबाजांकडून सरकारी वेबसाइटच्या नावासारख्याच वेबसाईट तयार करून त्या वेबसाईटचा नागरिकांची फसवणूक करण्यासाठी वापर केला जात आहे. नागरिकांनी वाहतूक दंडाच्या चलनाची सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर योग्य पडताळणी करूनच त्यावर क्लिक करावे, असे आवाहन गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हा विभागाने केले आहे.