Home बातम्या लोकसभेतील खासदारांच्या हजेरीबाबत मोठा बदल

लोकसभेतील खासदारांच्या हजेरीबाबत मोठा बदल

0

सभागृहाच्या लॉबीतून हजेरी लावण्याची पद्धत बंद; आता आसनावरूनच नोंदवता येणार उपस्थिती

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेतील हजेरीबद्दल मोठा बदल केला आहे. हा नवीन नियम 2026 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून लागू होणार आहे. यापूर्वीच्या नियमाप्रमाणे खासदार सभागृहाच्या लॉबीमधूनही आपली उपस्थिती नोंदवू शकत होते. आता ही उपस्थिती नोंदविण्याची पद्धत बंद केली जाणार आहे. नवीन नियमानुसार, लोकसभेतील सदस्यांना त्यांची उपस्थिती त्यांना दिलेल्या आसनावरूनच नोंदविता येणार आहे. देशभरातून निवडून आलेल्या खासदारांना कामकाजात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

नवीन बदलाच्या पाश्वभूमीवर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला म्हणाले की, यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून सभागृहातील सदस्य त्यांना निर्धारित केलेल्या जागेवरूनच उपस्थिती नोंदवू शकणार आहेत. यापूर्वी सदस्य सभागृहाच्या लॉबीतूनही उपस्थिती नोंदवू शकत होते. ही प्रक्रिया आता बंद केली जाणार आहे कारण संसदेच्या सदस्यांना सक्रियपणे भाग घेता येईल.

लखनऊमध्ये आयोजित 86 व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेच्या निमित्ताने पत्रकारांशी संवाद साधताना ओम बिर्ला यांनी ही माहिती दिली. संसदेत गांभीर्य आणि शिस्त असणे आवश्यक आहे. लोकसभेतील सदस्य म्हणजे खासदार सभागृहाचे कामकाज सुरू असतानाच त्यांची उपस्थिती नोंदवू शकतील. जर सभागृह तहकूब झाले किंवा गोंधळामुळे कामकाज थांबले असले तरीही लोकसभेतील सदस्य आपली उपस्थिती नोंदवू शकतील.

लोकसभा सभापतींनी घेतलेल्या या नव्या निर्णयचा उद्देश केवळ संसदेत उपस्थिती वाढविण्याचा नसून तर कामकाजात खासदारांचा सक्रिय सहभागही वाढविण्याचा आहे. यासाठी लोकसभेतील प्रत्येक जागेवर कन्सोल बसवण्यात आले आहेत. ज्यामुळे खासदारांना उपस्थिती नोंदवता येईल. संसदेतील कार्यपद्धतीचे आधुनिकीकरण करण्यासाठी आणि संसदेतील अधिवेशनांची उत्पादकता वाढविण्यासाठी केलेल्या व्यापक सुधारणांचा हा भाग आहे.
यंदा देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग 9 व्यांदा अर्थसंकल्प सादर करतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या 28 जानेवारी रोजी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत. त्यानंतर केंद्रीय अर्थसंकल्प दि. 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता सादर केला जाईल.