पणजी महानगरपालिकेच्या आगामी मार्च 2026 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रभाग फेररचनेचा मसुदा जाहीर करण्यात आला असून, नागरिकांकडून सूचना, आक्षेप मागवण्यात आले आहेत. पणजी महानगरपालिकेच्या 30 प्रभागाच्या फेररचनेचा मसुदा जारी करण्यात आला आहे. या मसुद्यात आगामी निवडणुकांसाठी शहरातील प्रभागाची माहिती देण्यात आली आहे. हा मसुदा 21 जानेवारी ते 29 जानेवारीपर्यंत रविवार आणि सार्वजनिक सुट्टी वगळता सर्व कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत तिसवाडी येथील मामलेदार कार्यालय तसेच महानगरपालिका कार्यालयात सार्वजनिक तपासणीसाठी खुला ठेवण्यात आला आहे. या कालावधीत मसुदा प्रभाग परिसीमांबाबत नागरिकांकडून त्यांच्या सूचना, सुधारणा किंवा दुरुस्त्या सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तिसवाडी येथील मामलेदार कार्यालयात सूचना सादर करता येतील, असे नगरविकास विभागाच्या संचालकांनी जारी केलेल्या सूचनेत म्हटले आहे.