Home Featured गुन्हेगारी निपटून काढण्यास गोवा पोलीस सक्षम

गुन्हेगारी निपटून काढण्यास गोवा पोलीस सक्षम

0

आमदार दाजी साळकर यांचे प्रतिपादन

बायणा दरोडाप्रकरणी तपास केलेल्या पोलिसांचा सन्मान

बायणा येथील दरोडा पोलिसांसाठी एक आव्हान होते. ते लीलया पेलताना पोलिसांनी संशयितांना जेरबंद केले. आमचे पोलीस गुन्हेगारी प्रकरणांचा सोक्षमोक्ष लावण्यास सक्षम आहेत. गुन्हेगारी निपटून काढण्यास सक्षम असल्याचे बायणा दरोडा प्रकरणी पोलिसांनी दाखवून दिले असून वास्कोचे उपअधीक्षक गुरुदास कदम व अन्य पोलिस अभिनंदनास पात्र आहेत, असे वास्कोचे आमदार कृष्णा ऊर्फ दाजी साळकर यांनी सांगितले. पोलिसांच्या या कामगिरीमुळे संपूर्ण गोव्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे असेही ते म्हणाले.

बायणा दरोडा प्रकरणाचा छडा लावण्यात आणि सर्व आरोपींना अटक करण्यात धाडसी आणि सक्रिय भूमिका बजावल्याबद्दल आमदार कृष्णा साळकर आणि वास्को भाजप मंडळाने पोलीस पथकाचे कौतुक केले. बायणा येथील सशस्त्र दरोडा प्रकरणाचा यशस्वी छडा लावल्याने वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी शुक्रवारी मुरगाव पोलीस उपअधीक्षक गुरुदास कदम, वास्को पोलीस निरीक्षक वैभव नाईक, तसेच मुरगाव पोलीस निरीक्षक शेरीफ जाकीस व त्यांच्या टीमचा गौरव करून अभिनंदन केले. त्यावेळी आमदार साळकर बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष गिरीश बोरकर, नगरसेवक अमेय चोपडेकर, उमेश साळगांवकर यांची उपस्थिती होती.
दि. 18 नोव्हेबर रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास बायणा येथील चामुंडी आर्केड इमारतीमध्ये सहाव्या मजल्यावर राहणारे सागर नायक यांच्या फ्लॅटवर सहा ते सात दरोडेखोरांच्या टोळीने दरोडा घालून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम मिळून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला होता. दरोडेखोरांनी नायक यांच्यासह त्यांची पत्नी हर्षा आणि मुलगी नक्षत्रा यांनाही बेदम मारहाण केली होती. या हल्ल्यात सागर हे गंभीर जखमी झाले होते.

सदर दरोडा प्रकरण हे वास्को व मुरगाव पोलिसांसाठी आव्हान ठरले होते. त्याचबरोबर उच्चस्तरीय अधिकारी वर्गाचीही यामुळे झोप उडाली होती. वास्को, मुरगाव तसेच गोवा उच्चस्तरीय पोलिस दलाने दिवस रात्र एक करुन घटनेचा सहा दिवसांत छडा लावण्यात यश मिळवले. यासाठी पोलीस दल कौतुकास पात्र ठरले व सर्व थरातून त्यांचे कौतुक होत आहे.

आमदारांहस्ते गौरव
दरम्यान, वास्कोचे आमदार दाजी साळकर व वास्को भाजप मंडळातर्फे शुक्रवारी मुरगाव पोलीस उपअधीक्षक गुरुदास कदम, वास्को पोलीस निरीक्षक वैभव नाईक, तसेच मुरगाव पोलीस निरीक्षक शेरीफ जाकीस व त्यांच्या टीमचा स्मृतीचिन्ह देऊन गौरव केला व अभिनंदन केले. यात बायणा येथील सशस्त्र दरोडा प्रकरणाचा यशस्वी छडा लावलेल्या गुरुदास कदम (एसडीपीओ वास्को), वैभव डी नाईक (वास्को पोलीस निरीक्षक), शेरिफ जॅकीस (मुरगाव पोलीस निरीक्षक), सिद्धेश नाईक (पीएसआय), राजदत्त आर्सेकर, अजित शिरोडकर, व्यंकटेश गावंदर, अमर गावकर, अनिल जाधव, सिद्धेश नाईक (पोलिस कॉन्स्टेबल), संगमेश भाऊ, निखिल नाईक देसाई (पीएसआय), आशिष आरोलकर, पुरुषोत्तम (बाळू) नाईक, संतोष भाटकर, संजय हलूर, रूपेश साळवी, निलेश साळगावकर, गौरेश नाईक, (एचजी वास्को पीएस) आदी वास्को व मुरगाव पोलीस स्थानकाशी संलग्न असलेल्या पोलिसांना आमदार कृष्णा साळकर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी त्यांच्यासमवेत वास्को भाजप मंडळ अध्यक्ष सिद्धार्थ कासकर, नगरसेवक दीपक नाईक, कदंब महामंडळाचे उपाध्यक्ष क्रितेश गांवकर, समाजसेवक उमेश साळगांवकर, नगराध्यक्ष गिरीश बोरकर, दिलीप काजळे, स्वराज नाईक, नगरसेवक अमेय चोपडेकर, विश्वंभर फडते, प्रशांत दिवकर, मनोज नाईक, मुन्ना आदी उपस्थित होते.

उप अधीक्षक गुरुदास कदम यांनी वास्कोच्या लोकांना एक शक्तिशाली आणि भावनिक संदेश दिला, त्यांच्या विश्वासाबद्दल त्यांचे आभार मानले आणि अटळ संरक्षणाचे आश्वासन दिले. सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी गरज पडल्यास वास्को पोलीस आपले प्राण देण्यास तयार आहेत असे प्रतिपादन यावेळी श्री. कदम यांनी केले. गोवा पोलिस जनतेच्या सेवेसाठी तत्पर असून यासाठी जनतेचे सहकार्य मोलाचे आहे असे ते म्हणाले.

वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी बायणा दरोडा प्रकरण जलद आणि व्यावसायिक पद्धतीने हाताळल्याबद्दल डीवायएसपी, पीआय वैभव नाईक आणि वास्को पोलीस पथकाचा सत्कार केल्यानंतर त्यांनी सांगितले की त्यांच्या तत्पर कारवाईमुळे जनतेचा विश्वास वाढला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या पाठिंब्याचे कौतुक केले आणि गोव्याची कायदा आणि सुव्यवस्था मजबूत केल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आभार मानले.