Home बातम्या आवडीचे क्षेत्र निवडण्यास पाल्यांना प्रेरणा द्या

आवडीचे क्षेत्र निवडण्यास पाल्यांना प्रेरणा द्या

0

प्राचार्य श्रीकृष्ण नाईक यांचा पालकांना सल्ला; साळ शाळा समूहाचे वार्षिक बक्षीस वितरण

ज्या ज्या क्षेत्रात पाल्यांना आवड असेल, त्या त्या क्षेत्रात पालकांनी त्यांना पुढे जाण्यास प्रेरणा द्यावी, त्यातून ते भविष्यात यश मिळवू शकतील. आगामी दहावीची परीक्षा ही राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार होणारी पहिली परीक्षा असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कसून अभ्यास करावा, असा सल्ला गोवा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त साखळी उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्रीकृष्ण एस. नाईक यांनी दिला.

साळ येथील सरकारी माध्यमिक विद्यालय आणि शाळा समूह आयोजित वार्षिक बक्षीस वितरण व स्नेहसंमेलन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
श्रीकृष्ण नाईक यांच्या हस्ते दीपज्योती प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर खास निमंत्रित म्हणून म्हापसा येथील विद्यालयातील शिक्षिका सावित्री साजरो घाडी, हायस्कूलचे मुख्याध्यापक सतीश तळकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेंद्र राऊत, पालक-शिक्षक संघाचे अध्यक्षा श्रावणी राऊत, हायस्कूलचे निवृत्त सहाय्यक शिक्षक दीपक पिरणकर, सरकारी प्राथमिक शाळा साळच्या प्रभारी मुख्याध्यापिका गीता राऊत, साळ पुनर्वसन सरकारी प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक धाकटू पाटील, सरकारी प्राथमिक विद्यालय वडावलचे प्रभारी मुख्याध्यापक वसंत परवार आणि कृष्णा राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

साळ शाळा समूहात सरकारी माध्यमिक विद्यालय साळ, सरकारी प्राथमिक शाळा साळ, वडावल व साळ पुनर्वसन यांचा समावेश आहे.
आदर्श विद्यार्थी म्हणून हर्षद दुर्गा वडार, आदर्श विद्यार्थिनी म्हणून समृद्धी सूर्यकांत परब, अष्टपैलू विद्यार्थी म्हणून प्रकृती दिलीप परब, उत्कृष्ट महिला खेळाडू त्रेषा तुळशीदास परवार, उत्कृष्ट पुरुष खेळाडू म्हणून देवदीप राऊत यांना सन्मानित करण्यात आले. तसेच 2024-25 या शैक्षणिक वर्षात दहावीच्या परीक्षेत विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवलेल्या सोनल बाळाप्पा सुतार, द्वितीय – साईश महेश परब, तृतीय – रिया वसंत राऊत यांना मान्यवरांच्या हस्ते विशेष पुरस्काराने सन्मानित केले.

सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका विनिता श्रीराम बायकर व प्रणाली नाईक यांनी केले. शिक्षिका दीपा गावकर यांनी वार्षिक अहवाल वाचन केले. दहावीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविलेल्यांची नावे शिक्षिका प्रीता टोपले यांनी जाहीर केली. सांस्कृतिक कार्यक्रमातील बक्षिसे विजेत्यांची नावे समीक्षा गाड सावळ, क्रीडा क्षेत्रातील विजेत्यांची नावे आकाश राऊत यांनी तर शाळा समूहाच्या स्पर्धांत बक्षीस प्राप्त विद्यार्थ्यांची नावे शिक्षिका गीता राऊत यांनी जाहीर केली .
शिक्षिका खुशाग्नी सावंत व शिक्षिका उत्कर्षा वर्दम यांनी औपचारिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शिक्षिका प्रणाली देसाई आभार प्रदर्शन केले. यानंतर स्नेहसंमेलन पार पाडले.