Home Featured कसमशेळ ग्रामस्थांचाही आयआयटीला विरोध

कसमशेळ ग्रामस्थांचाही आयआयटीला विरोध

0

बेतोडा पंचायत क्षेत्रातील कोडार गावातील लोकांकडून आयआयटी संकुल प्रकल्पाला विरोध झाल्यानंतर जवळच असलेल्या कसमशेळ वाड्यावरील लोकांनीही विरोध दर्शवला आहे. मुख्यमंत्र्यांना कुणीतरी चुकीची माहिती दिल्याचा ग्रामस्थांचा संशय असून, गावात 95 टक्के लोक कृषी कार्डधारक आहेत. त्यामुळे पुन्हा सर्वेक्षण करण्याचे आवाहन ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे. अन्यथा एकत्रित लढा देण्यास तयार असल्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

बेतोडा पंचायत क्षेत्रात सरकारने आयआयटी प्रकल्प उभारण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. ग्रामस्थांना विश्वासात न घेता सरकारने घेतलेला निर्णय चुकीचा आहे. कसमशेळ वाड्यावरील लोक 95 टक्के कृषी कार्डधारक आहेत. सर्व जण लोक बागायती करून उदरनिर्वाह करीत आहे. तसेच गावातील लोक अनुसूचित जमातीचे असून, सरकारने समाजाच्या लोकांवर अन्याय करू नये, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

सरकारने आयआयटी प्रकल्प बागायत परिसरात उभारण्याचा प्रयत्न करू नये. प्रकल्प उभारल्यास स्थानिक लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनणार आहे. जबरदस्तीने आयआयटी संकुल उभारण्यास प्रयत्न केल्यास स्थानिक लोक आंदोलन करण्यात तयार असल्याचे कसमशेळ वाड्यावरील ज्ञानेश्वर खांडेपारकर यांनी सांगितले.