भाजपचा उमेदवार 23 सप्टेंबरला ठरणार; मुख्यमंत्र्यांची माहिती
गोवा विधानसभेच्या सभापतिपदासाठी 25 सप्टेंबर रोजी घेण्यात येणाऱ्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्यावतीनेकाँग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी काल आपला उमेदवारी अर्ज गोवा विधानसभा सचिवांकडे सादर केला. दरम्यान, सत्ताधारी भाजपचा उमेदवार 23 सप्टेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
रमेश तवडकर यांनी 21 ऑगस्ट रोजी सभापतिपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले आहे. नवीन सभापतींची निवड करण्यासाठी येत्या 25 सप्टेंबरला एका दिवसाचे विधानसभा अधिवेशन बोलावण्यात आले आहे.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सभापतिपदाच्या निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षांच्या आमदारांची एक बैठक पर्वरी येथे विधानसभा संकुलात काल घेतली. या बैठकीत विरोधी पक्षांच्या सभापतिपदासाठी उमेदवाराच्या नावावर चर्चा करण्यात आली. त्यात आमदार एल्टन डिकॉस्टा यांचे सभापतिपदाच्या उमेदवारीसाठी नाव निश्चित करण्यात आले. त्यानंतर डिकॉस्टा यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी काँग्रेसचे आमदार ॲड. कार्लुस फेरेरा, आपचे आमदार व्हेन्झी व्हिएगस, क्रूझ सिल्वा यांची उपस्थिती होती. काँग्रेसच्या सभापतिपदाच्या उमेदवाराला इतर विरोधी पक्षांचाही पाठिंबा आहे. गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांच्याशीही या विषयावर चर्चा करण्यात आली आहे, अशी माहिती युरी आलेमाव यांनी दिली.