अनेक ठिकाणी पडझड
आतापर्यंत 110 इंच पाऊस काणकोण,
वास्कोत इमारतीचे भाग कोसळले
मोसमी पावसाने राज्याला दोन दिवस झोडपून काढल्यानंतर मागील चोवीस तासांत पावसाचे प्रमाण कमी झाले होते. तथापि, शुक्रवारी पहाटेपासून पुन्हा एकदा पावसाची संततधार सुरू झाली. दरम्यान, येथील हवामान विभागाने राज्यात येत्या 4 सप्टेंबरपर्यंत पावसाची शक्यता व्यक्त करून एलो अलर्ट जारी केला आहे.
राज्यात जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे विविध ठिकाणी पडझडीला सुरुवात झाली आहे. पणजीतील कदंब स्थानक, दयानंद बांदोडकर मार्ग, पाटो, सांतइनेज आदी भागातील अर्तंगत रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागला.
110 इंच पाऊस
राज्यात चोवीस तासांत 1.72 इंच पावसाची नोंद झाली. मुरगाव येथे सर्वाधिक 2.78 इंच पावसाची नोंद झाली. राज्यात आतापर्यंत एकूण 110.86 इंच पावसाची नोंद झाली. शुक्रवारी सकाळी 8.30 ते संध्याकाळी 5.30 यावेळेत पणजीमध्ये 2.12 इंच पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात मागील चोवीस तासांत म्हापसा येथे 1.26 इंच, पेडणे येथे 1.80 इंच, पणजी येथे 1.45 इंच, जुने गोवा येथे 1 इंच, साखळी येथे 1.29 इंच, फोंडा येथे 2.28 इंच, धारबांदोडा येथे 2.46 इंच, काणकोण येथे 1.18 इंच, दाबोळी येथे 0.88 इंच, मुरगाव येथे 2.78 इंच, केपे येथे 2.44 इंच आणि सांगे येथे 2.22 इंच अशा पावसाची नोंद झाली आहे.
पैंगीण-काणकोणात दरड कोसळून इमारतीस धोका
काणकोण तालुक्यात पावसाचे थैमान सुरू आहे. मुसळधार पावसाने कित्येक ठिकाणचा परिसर जलमय झाला. दरडी कोसळल्या, वाहतुकीवर परिणाम झाला. महालवाडा पैंगीण येथील हादी ओहोळ बुडाला. गुळे येथे रस्त्यावर पाणी आले, दाभेल येथील बंधारा, अर्धफोंड नदीने पाण्याची पातळी ओलांडली आहे.
गाळये पैंगीण येथील लक्ष्मी सर्व्हिस स्टेशनजवळ दरड कोसळल्यामुळे इमारतीचा एक भाग कोसळण्याची दुर्घटना काल शुक्रवारी घडली. सुदैवाने गणेशोत्सवामुळे सदर सर्व्हिस स्टेशन दोन दिवसांसाठी बंद होते. यामध्ये सहा कामगार काम करतात.
धोकादायक इमारतींवर कारवाईची मागणी
काणकोण नगरपालिका क्षेत्रातील अत्यंत जुन्या आणि धोकादायक स्वरूपात असलेल्या इमारतीसंबधी गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे नगरसेवक रमाकांत ना. गावकर यांनी सांगितले.
चावडी प्रभागात पाच धोकादायक इमारती असून त्यातील काही इमारती भग्नावस्थेत आहेत. या आठवड्यात पावसाने रौद्ररूप धारण केलेले आहे. अशा वेळी या इमारती कोसळण्याची शक्यता असल्याचे श्री. गावकर यांनी सांगितले.
वास्कोत इमारतींच्या बाल्कनी कोसळल्या
अविरत पडलेल्या पावसाच्या तडाख्याने वास्कोमधील जीर्ण झालेल्या हॅपी अपार्टमेंट इमारतीच्या दोन बाल्कनी कोसळल्या. वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, नगरसेवक शमी साळकर यांनी पाहणी केली. या घटनेमुळे वास्कोमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदर इमारत गेली कित्येक वर्षे जीर्णावस्थेत असून या इमारतीत दोन तीन फ्लॅटमध्ये लोक राहतात. तसेच या इमारतीखाली एक गॅरेज व दुकान असून चतुर्थी उत्सव असल्याने काल सदर गॅरेज व दुकान बंद होते. पाच वर्षांपूर्वी याच इमारतीमधील एका फ्लॅटमध्ये स्लॅब कोसळला होता. त्यावेळी या फ्लॅटमध्ये एक कुटुंब राहत होते.
याविषयी चिंता व्यक्त करताना आमदार साळकर यांनी, जीर्ण इमारतींच्या मालकांना जबाबदार धरण्यात येणार आहे. अशा घटना टाळण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना कठोर धोरण राबविण्यासाठी विनंती करणार असल्याचे सांगितले.
यावेळी त्यांच्यासोबत मुरगावचे पोलिस उपअधीक्षक गुरुदास कदम, वास्को पोलूस निरीक्षक वैभव नाईक, वास्को वाहतूक पोलीस निरीक्षक एलविटो फर्नांडिस, आपत्कालीन व्यवस्थापन समितीचे अधिकारी हनुमंत मांद्रेकर, अग्निशामक दलाचे दिलीप डिचोलकर उपस्थित होते.
30 इमारती धोकादायक
मुरगाव पालिकेच्या हद्दीत, जवळजवळ 30 हून अधिक इमारती संरचनात्मकदृष्ट्या अयोग्य म्हणून चिन्हांकित करण्यात आल्या आहेत. मात्र त्यातील काही अजूनही वापरात आहेत. या इमारती 45 वर्षांहून अधिक जुन्या आहेत.