उत्तराखंडमधील धराली गाव ढगफुटीनंतर आलेल्या पाण्याच्या लोंढ्यात गाळाखाली गाडले गेल्यानंतर नुकतीच चमोली जिल्ह्यामध्ये देखील ढगफुटीने वाताहत झाली. काही दिवसांपूर्वी काश्मीरमध्येही किश्तवाडमध्ये ढगफुटीने हाहाकार माजवला होता. उत्तराखंड असो अथवा हिमाचल प्रदेश किंवा जम्मू काश्मीर, अशा प्रकारच्या घटना ह्या आता अगदी नेहमीच्या होऊन बसल्या आहेत. जागतिक हवामान बदलांचा परिणाम म्हणून आजकाल हवामान एवढे बेभरवशाचे झाले आहे की सांगता सोय नाही. मात्र, अचानक होणाऱ्या अशा ढगफुटीमुळे किंवा प्रलयंकारी पावसामुळे जी वाताहत होते, तिला मात्र केवळ निसर्ग नक्कीच जबाबदार नसतो. पर्यावरणदृष्ट्या अतिशय संवेदनशील अशा भागामध्ये बेफाम बांधकामांचा जो सपाटा मानवाने लावला आहे, ज्या प्रकारे विविध विकासप्रकल्पांचे बेधडक बांधकाम केले जाते आहे, त्यातूनच हा भूभाग अधिक स्खलनशील आणि धोकादायक बनू लागला आहे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे आणि ते दुर्लक्षिता येण्यासारखे नाही. आतापर्यंत ज्या ज्या दुर्घटना आपल्या पर्वतीय प्रदेशांमध्ये घडल्या, त्यातून त्या साऱ्या नैसर्गिक विद्ध्वंसामागे किंबहुना त्या विद्ध्वंसाची तीव्रता वाढण्यामागे मानवाचीच बेफिकिरी आणि बेफाम प्रवृत्ती कारणीभूत असल्याचे वेळोवेळी समोर येत राहिले आहे. नद्यांचे, नाल्यांचे प्रवाह अडवून केली जाणारी बांधकामे, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागांमध्ये वाढत चाललेली मानवी वस्ती व परिणामी डोंगर कापून बनवले जाणारे सपाटीकरण, होणारी बेफाट वृक्षतोड, दिवसागणिक उभी राहणारी बांधकामे, पर्यटकांची वाढती वर्दळ आणि त्यामुळे वाढलेली वाहतूक ह्या साऱ्याचा फटका अशा आपत्तीवेळी स्थानिक जनतेला बसत असतो. धरालीमध्ये हिमनग वितळून बनलेल्या तलावाचा बांध फुटला आणि ते गाळमिश्रीत पाणी रोंरावत खाली गेले त्याचा भयावह व्हिडिओ जगाने पाहिला. परंतु हा पाण्याचा लोट जेव्हा खाली आला तेव्हा त्या नदीच्या वळणावर उभी असलेली बांधकामेच त्याने आपल्या कवेत घेतली. मुळामध्ये नदीच्या ह्या वळणावर एवढ्या मोठ्या प्रमाणात बांधकामे कशी उभी राहू शकली, त्यातून त्या खीरगंगा नदीचा नैसर्गिक प्रवाह अडवला गेला नसेल का असे प्रश्न त्यानंतर उपस्थित केले गेले. पूर्वी पावसाळ्याचा हंगाम हा पर्वतीय प्रदेशात भटकण्यास धोक्याचा असे मानले जात असे. परंतु आजकाल कोणत्या हंगामात काय घडेल हे सांगता येत नाही अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती सातत्याने समोर येत आहेत. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर ह्या राज्यांमध्ये विशेषतः दरडी कोसळणे, रस्ते खचणे, वाहतूक बंद पडल्याने पर्यटक अडकणे ह्या घटना इतक्या सातत्याने होत असतात की तेथे जावे की न जावे असा प्रश्न पर्यटकांना पडत असतो. आधीच बेभरवशाचे हवामान आणि त्यात अत्यंत धोकादायक बनलेला भूभाग ह्यामुळे कधी कोणते निमित्त घडेल आणि काळ येईल सांगता येत नाही अशा प्रकारच्या असुरक्षित वातावरणामध्ये ह्या भागातील स्थानिक लोक जगत असतात. वाढत्या उष्णतेमुळे हिमनग वितळणे, किंवा ढगफुटीमुळे अचानक नदीत पाण्याचा प्रवाह वाढणे अशा घटना तर सातत्याने घडू लागल्या आहेत. अस्थिर उतारावरील बांधकामांना त्यामुळे मोठा धोका पोहोचतो. हे सगळे रोखायचे असेल तर पर्यावरणाच्या बाबतीत नुसता देखावा कामाचा नाही. गांभीर्याने आणि स्वयंप्रेरणेने नियोजन आणि नियमनासाठी स्थानिक प्रशासनाला आणि जनतेला पावले उचलावी लागतील. धार्मिक म्हणा किंवा अन्य पर्यटनाच्या निमित्ताने स्थानिकांना रोजीरोजी प्राप्त होते ही गोष्ट खरी, परंतु पर्यटनाच्या बेछूट वाढीमुळे त्या गावांवरील, तेथील नैसर्गिक संसाधनांवरील ताणही तेवढाच वाढताना दिसत आहे. त्यामुळे त्याचा फटका नैसर्गिक आपत्तीच्या वेळी बसताना दिसत असतो. खरे म्हणजे आज तंत्रज्ञान एवढे पुढे गेलेले आहे की, कोठे कोणत्या प्रकारची दुर्घटना घडू शकते त्याचा अचूक अंदाज यंत्रणा वर्तवू शकतात. गरज असते ती हा इशारा सर्वांपर्यंत वेळेत पोहोचवून त्यांच्या मदतीसाठी प्रशासनाने उपाययोजना करण्याचा. त्यामध्ये अनेकदा कमतरता राहून जाते आणि ती नागरिकांसाठी जीवघेणी ठरते. त्यामुळे अशा प्रकारच्या संभाव्य आपत्तीची माहिती जनसामान्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवून त्यांना सावध करण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञानाधारित सुनियोजित व्यवस्था उभारली गेली पाहिजे. शिवाय आपत्ती घडल्यानंतर मदतकार्यास आरंभ करण्यात येणाऱ्या अडचणींमुळे वेळ वाया जात असतो, जो प्राणघातक ठरत असतो. त्यामुळे आपत्ती निवारण यंत्रणेचेही अत्याधुनिकीकरण गरजेचे आहे, ज्यायोगे अत्याधुनिक संसाधनांचा वेगवान वापर शक्य होऊ शकेल. येणारी प्रत्येक आपत्ती काही ना काही धडा देत असते. गरज असते ती त्यापासून बोध घेण्याची.