Home Featured विद्युतभारित तारांच्या धक्क्याने 2 भावांचा मृत्यू

विद्युतभारित तारांच्या धक्क्याने 2 भावांचा मृत्यू

0

रानडुकरांसाठी लावली होती तार; सुरसुरे येथील घटना; मृत रिवण येथील रहिवासी; गावकर कुटुंबीयांवर चतुर्थी दिवशीच दु:खाचा डोंगर

रानडुकरांसाठी लावलेल्या विद्युतभारित तारांचा झटका बसल्याने सांगे तालुक्यातील पांडवसडा-रिवण येथील दोघा भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बुधवारी गणेशचतुर्थी दिवशीच घडलेल्या या घटनेने गावकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राजेंद्र गावकर (46) आणि मोहनदास गावकर (40) अशी मृतांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र गावकर व मोहनदास गावकर या दोघांचा दुग्धव्यवसाय आहे. गणेशाचे पूजन करून दुपारच्या आरत्या व जेवट आटोपून गायी-गुरांना चारा आणण्यासाठी बुधवारी सायंकाळी ते जामळेमळ सुरसुरे येथे जंगलात गेले होते. चारा आणण्यासाठी त्यांनी आपली रिक्षा नेली होती. चारा कापून परतत असताना राजेंद्र गावकर यांच्या पायाला विजेच्या तारांचा स्पर्श झाला आणि ते खाली कोसळले. विजेच्या धक्क्याने ते कोसळले याची कल्पना नसल्याने भाऊ मोहनदास हे त्यांना उचलायला गेले असता त्यांनाही विजेचा धक्का बसला आणि ते जमिनीवर कोसळले. रात्री उशिरापर्यंत दोघेही घरी परतले नसल्याने कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी जंगलात त्यांचा शोध घेतला. यावेळी जामळेमळ येथे त्यांची रिक्षा दिसून आली. तेथून पुढे काही अंतरावर ते दोघेही निपचित पडलेले दिसले. त्यांना तात्काळ आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले; मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती गावकर यांचे नातेवाईक व रिवण येथील जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर यांना समजताच त्यांनी तात्काळ पोलिसांना ही माहिती दिली. तसेच या घटनेची माहिती मिळताच मंत्री सुभाष फळदेसाई यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी तात्काळ केपे पोलीस आणि वीज खात्याच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण केले. दरम्यान, दोघांचे मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात शवचिकित्सेसाठी पाठवण्यात आले. या घटनेचा अधिक तपास केपे पोलीस करीत आहेत.

एका भावाच्या हातात अडकली तार
चतुर्थी दिवशी विजांच्या गडगडाटानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तवला जात होता; परंतु नंतर त्यांचा मृत्यू विद्युतभारित तारांच्या धक्यानेच झाला हे स्पष्ट झाले. मृत भावांपैकी एकाच्या हातात वीजवाहिनी अडकली होती असे आढळून आले. त्यातून मृत्यूचे कारण समोर आले.